Home Breaking News ललितपुरमध्ये धक्कादायक अपघात: मंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या फॉर्च्युनरने तिघांना चिरडले, एकाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा...

ललितपुरमध्ये धक्कादायक अपघात: मंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या फॉर्च्युनरने तिघांना चिरडले, एकाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा रस्तारोको

27
0
ललितपुर | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील ललितपुर जिल्ह्यात एक भीषण आणि खळबळजनक अपघात घडला असून, भाजप सरकारमधील राज्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर नोंद असलेल्या फॉर्च्युनर कारने दुचाकीवरील तिघा तरुणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप उसळला.
हा अपघात सोमवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात मागून आलेल्या फॉर्च्युनर कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार सुमारे ३०० मीटरपर्यंत घासत गेली, कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि रस्त्यावर वाहनाचे अनेक भाग विखुरले गेले.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की संबंधित कार उत्तर प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री मनोहरलाल पंथ यांच्या पत्नी कस्तुरी देवी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. अपघाताच्या वेळी कारमध्ये मंत्र्यांचा मुलगा आणि अन्य चार जण उपस्थित होते, आणि सर्वजण दारूच्या नशेत होते, असा गंभीर आरोप करण्यात येत आहे. संतप्त जमावाने असा दावाही केला की, अपघातानंतर कारमधील व्यक्तींनी आधी शस्त्र दाखवून दहशत निर्माण केली आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला.
मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी अपघातग्रस्त कारला घेराव घातला, रस्त्यावर बसून जोरदार आंदोलन व रस्तारोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जमावाला समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, या घटनेने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, “कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही” अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. जखमी तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, मंत्र्यांच्या कुटुंबीयांचा संबंध असल्याने निष्पक्ष तपास होईल का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.