Home Breaking News “मुंबईची नाडी “बाळासाहेब” ठाकरेंइतकी कुणालाही समजली नाही” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट...

“मुंबईची नाडी “बाळासाहेब” ठाकरेंइतकी कुणालाही समजली नाही” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट मत

19
0
मुंबई : “बाळासाहेब” ठाकरे यांचा जन्म मुंबईत झाला नसला, तरी मुंबईची नाडी, तिची संस्कृती, तिचे प्रश्न आणि तिचे स्वप्नं जितकी त्यांना समजली, तितकी आजवर कुणालाही समजलेली नाही,” असे ठाम मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना ‘बाहेरचे’ ठरविल्याच्या वक्तव्यावर उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणाले की, मुंबई ही केवळ शहर नाही, तर ती एक भावना आहे. या शहराच्या विकासासाठी दृष्टी, धैर्य आणि दीर्घकालीन नियोजनाची गरज असते. बालासाहेब ठाकरे यांनी मुंबईसाठी जे स्वप्न पाहिले होते, त्याच दिशेने सरकार काम करत आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी, गर्दी, प्रदूषण आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न यावर बोलताना त्यांनी सांगितले की, “मुंबईकरांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी ४०० किलोमीटरहून अधिक लांबीचा मेट्रो प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे.”
अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबाबत भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांना सोबत घेतल्याच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “राजकारणाची हीच वास्तविकता आहे. कोणताही पक्ष या वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. लोकशाहीत निर्णय हे केवळ भावनेवर नाही, तर परिस्थितीच्या भानातून घ्यावे लागतात.”
मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्या – घरांची टंचाई, वाहतूक, पाणी, स्वच्छता, रोजगार – यावर सरकार गंभीरपणे काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिच्या प्रगतीचा वेग थांबू देणार नाही. भविष्यातील मुंबई अधिक सुरक्षित, अधिक गतिमान आणि अधिक आधुनिक करण्याचा आमचा संकल्प आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या संवादातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडत, राजकारणापेक्षा शहराच्या भविष्याला अधिक महत्त्व असल्याचा संदेश दिला आहे.