Home Breaking News महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान; नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा, भाजपवर...

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान; नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा, भाजपवर जोरदार हल्लाबोल

10
0
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका, त्यात मुंबई महानगरपालिका (BMC)सह प्रमुख शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचाराचा जोर वाढला असून, सर्वच राजकीय पक्षांनी मैदानात पूर्ण ताकद झोकून दिली आहे.
नाशिकमध्ये झालेल्या संयुक्त सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर दिसले. या सभेत दोन्ही नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका करत मतदारांना आवाहन केले.
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “भाजपचे हिंदुत्व अस्सल नाही. दागी नेते, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक पक्षात घेतले जात आहेत. हीच पातळी राहिली तर उद्या राक्षसराज रावणालाही ते आपल्या पक्षात घेतील.” भाजप केवळ सत्तेसाठी कोणालाही सामावून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांनीही भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. “धर्म आणि जातीच्या नावावर जनतेला दिशाभूल करण्याचे काम भाजप करत आहे. विकासाऐवजी भावनांचा बाजार मांडून लोकांचे प्रश्न झाकले जात आहेत. शहरांचा खरा विकास करायचा असेल, तर स्थानिक नेतृत्वाला संधी द्या,” असे ते म्हणाले.
“एकदा सत्ता आमच्या हाती द्या, आम्ही शहरांचा चेहरामोहरा कसा बदलतो ते दाखवून देऊ,” असे आव्हानही त्यांनी मतदारांना दिले.
या संयुक्त सभेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, येणाऱ्या दिवसांत प्रचार अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक प्रश्न – पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि रोजगार – यावर कोण ठोस उपाय देतो, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. १५ जानेवारीच्या मतदानात जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, या निवडणुका राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या ठरणार आहेत.