पिंपरी-चिंचवड : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोपांची तोफ डागली आहे. भाजपच्या सत्ताकाळात शहरात हफ्तेखोरी, भ्रष्टाचार, टेंडर रिंग, दहशत आणि सत्तेचा माज निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी भाजपची जोरदार टीका केली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, “मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. बिनबुडाचे आरोप करणे ही माझी सवय नाही. भाजपच्या सत्ताकाळात शहराचा विकास नाही, तर केवळ भ्रष्टाचार फोफावला आहे.”
रस्ते, अतिक्रमण आणि हफ्तेखोरीवर गंभीर आरोप
अजित पवारांनी ‘अर्बन स्ट्रीट’ प्रकल्पावर टीका करत सांगितले की, या नावाखाली शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लावण्यात आली. अनेक रस्त्यांवर अतिक्रमण वाढले असून, तिथे उघडपणे हफ्तेखोरी सुरू आहे. “गेल्या नऊ वर्षांत भाजपच्या सत्तेत हा तथाकथित विकास झाला आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
टेंडर रिंग, संपत्ती वाढ आणि चौकशीची मागणी
टेंडर प्रक्रियेत रिंग करून दादागिरीने पैसे लाटल्याचा आरोप करत अजित पवार म्हणाले की, “स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संपत्ती अचानक कशी वाढली? पैसा कुठून आला? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.”
कुत्र्यांच्या नसबंदीपासून खोदाई माफियापर्यंत आरोप
महापालिकेवर टीका करताना त्यांनी सांगितले की, “सत्तेची मस्ती, माज आणि नशा भाजपला आली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्ले गेले. महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली गेली असून ती कर्जबाजारी करण्यात आली आहे.” पिंपरी-चिंचवडमध्ये खोदाई माफिया फोफावला असून जिओ, एअरटेल, व्होडाफोनसारख्या कंपन्या राजरोसपणे रस्ते खोदत असल्याने शहरातील वाहतूक कोंडी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
दहशतीच्या जोरावर बिनविरोध निवडणुका?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप करत अजित पवार म्हणाले, “बिनविरोध निवडीसाठी सिनेस्टाईल पाठलाग केला गेला. एका उमेदवाराला पकडून गाडीत बसवून अर्ज मागे घ्यायला लावण्यात आले. भाजपची ही राक्षसी भूक मला पाहवत नाही.” दहशतीमुळे काही उमेदवारांनी माघार घेतल्याची कबुलीही त्यांनी दिली.
ठेवी घटल्या, कर्ज वाढले
आर्थिक गैरव्यवहारांवर बोट ठेवताना अजित पवार म्हणाले की, “2017 पूर्वी पिंपरी महापालिकेच्या ठेवी 4,844 कोटी रुपये होत्या, त्या आता 2,000 कोटींवर आल्या आहेत. ठेवी वाढायला हव्या होत्या, उलट कर्जरोखे काढून कोट्यवधींचे कर्ज करण्यात आले. एवढा पैसा खर्च झाला असेल, तर काम दाखवा.”
1992–2017 च्या विकासाचा उल्लेख
शेवटी त्यांनी 1992 ते 2017 या कालखंडात पिंपरी-चिंचवडचा कायापालट कसा झाला, याचा उल्लेख करत शरद पवार यांनी शहराच्या विकासाला दिलेल्या गतीचे कौतुक केले. 2017 मधील विठ्ठल मूर्ती घोटाळ्याचा संदर्भ देत, त्या काळातील महापौर आज भाजपमध्ये असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अजित पवारांच्या या आक्रमक आरोपांमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, येत्या महानगरपालिका निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.