Home Breaking News देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ १७ जानेवारीला; गुवाहाटी–कोलकाता मार्गावर धावणार, पंतप्रधान मोदींच्या...

देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ १७ जानेवारीला; गुवाहाटी–कोलकाता मार्गावर धावणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

20
0
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले जाणार आहे. देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन १७ जानेवारीपासून गुवाहाटी ते कोलकाता दरम्यान धावणार असून, तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील मालदा टाउन येथे होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
ही वंदे भारत स्लीपर ट्रेन आठवड्यातील सहा दिवस कामाख्या आणि हावडा जंक्शन दरम्यान धावणार आहे. अत्याधुनिक सुविधा, वेगवान प्रवास, आरामदायी स्लीपर कोच, स्वच्छता, स्मार्ट सेफ्टी सिस्टीम आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान या ट्रेनमध्ये असणार आहे. त्यामुळे ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमधील प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, “वंदे भारत स्लीपर ही केवळ ट्रेन नसून, भारताच्या आधुनिक रेल्वे युगाची नवी ओळख आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही ट्रेन प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी पर्याय देणार आहे.”
याच कार्यक्रमात ६ नव्या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. या गाड्यांची सेवा १७ आणि १८ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. ‘अमृत भारत एक्सप्रेस’ या मध्यम व सामान्य प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा, अधिक गती आणि किफायतशीर दर यांचा समतोल साधणाऱ्या गाड्या असणार आहेत.
रेल्वेच्या या नव्या उपक्रमांमुळे देशभरातील दळणवळण अधिक गतिमान होणार असून, पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः ईशान्य भारताला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यात या गाड्या महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भारतीय रेल्वे ‘न्यू इंडिया’च्या संकल्पनेनुसार आधुनिकतेकडे झपाट्याने वाटचाल करत असून, वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत एक्सप्रेस या गाड्या त्या परिवर्तनाचे ठोस प्रतीक ठरणार आहेत.