Home Breaking News दिल्ली पोलिसांचा मोठा सायबर स्ट्राईक! आंतरराष्ट्रीय सायबर सिंडिकेटचा पर्दाफाश; चीन-पाकिस्तानसह ५ देशांचे...

दिल्ली पोलिसांचा मोठा सायबर स्ट्राईक! आंतरराष्ट्रीय सायबर सिंडिकेटचा पर्दाफाश; चीन-पाकिस्तानसह ५ देशांचे कनेक्शन उघड

18
0
नवी दिल्ली : सायबर गुन्हेगारीविरोधातील लढ्यात दिल्ली पोलिसांच्या IFSO (Intelligence Fusion & Strategic Operations) युनिटने ऐतिहासिक कामगिरी करत एका आंतरराष्ट्रीय सायबर सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. या टोळीचे धागेदोरे चीन, नेपाळ, कंबोडिया, तैवान आणि पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याचे तपासात उघड झाले आहे. या कारवाईत एका तैवानी नागरिकासह एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही टोळी अत्याधुनिक ‘सिम बॉक्स’ तंत्रज्ञानाचा वापर करून देश-विदेशातील कॉल्स भारतात वळवत होती. टेलीमार्केटिंगच्या नावाखाली हे कॉल्स सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आणि बनावट बँक कर्मचारी, सरकारी अधिकारी किंवा कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती. या टोळीने तब्बल २० हजारांहून अधिक फोन नंबरचा वापर करून देशभरात सायबर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
देशाच्या विविध भागांतून या टोळीविरोधात एक हजारांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासातच १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, प्रत्यक्ष नुकसान यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
IFSO युनिटने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत या टोळीच्या नेटवर्कचा माग काढला. विविध देशांतील सर्व्हर, आंतरराष्ट्रीय कॉल रूट्स आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत अखेर या टोळीला जेरबंद करण्यात यश आले. ही कारवाई केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक स्तरावर सायबर गुन्हेगारीविरोधातील महत्त्वाची मोहीम मानली जात आहे.
सायबर फसवणूक ही आज सामान्य नागरिकांसाठी मोठा धोका बनली असून, अशा आंतरराष्ट्रीय टोळ्यांमुळे कोट्यवधी लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईमुळे अशा गुन्हेगारांना कडक संदेश मिळाला असून, भविष्यातही सायबर गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.