Home Breaking News ठिठुरणारी दिल्ली, घसरता पारा… तापमान २ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता; दाट धुक्यामुळे जनजीवन...

ठिठुरणारी दिल्ली, घसरता पारा… तापमान २ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता; दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत, AQI अत्यंत खराब

21
0
नवी दिल्ली – देशभरात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला असून राजधानी दिल्ली आणि परिसरात थंडीने अक्षरशः कडाक्याची परिस्थिती निर्माण केली आहे. बर्फाळ वाऱ्यांमुळे तापमानात सातत्याने घट होत असून, नागरिक अक्षरशः गारठून गेले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज सोमवार, १२ जानेवारीसाठी दिल्ली-एनसीआरमध्ये शीतलहरीचा इशारा जारी केला आहे. येत्या काही दिवसांत तापमान थेट २ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सकाळच्या वेळेस दाट धुक्याने संपूर्ण दिल्ली-एनसीआर झाकून टाकले असून, अनेक भागांत दृश्यमानता अत्यंत कमी झाली आहे. महामार्गांवर वाहनांची गती मंदावली असून, वाहनचालकांना लाईट्स आणि इंडिकेटर चालू ठेवूनच प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी तर रस्त्यांवर वाहतूक अक्षरशः रेंगाळताना दिसून आली.
या धुक्याचा फटका रेल्वे आणि विमानसेवेलाही बसला आहे. दिल्लीकडे येणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत असून, प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. विमानसेवांवरही परिणाम झाला असून काही उड्डाणे विलंबाने रवाना झाली आहेत. थंडी आणि धुक्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, थंडीसोबतच राजधानीतील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI)ही अत्यंत खराब पातळीवर पोहोचला आहे. थंड हवामान आणि हवेत साचलेले प्रदूषण यामुळे श्वसनविकार असलेल्या रुग्णांसाठी परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
हवामान विभागानुसार, पुढील काही दिवसांतही थंडीचा कहर कायम राहणार असून, सकाळ-संध्याकाळ दाट धुके आणि दिवसभर गार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे परिधान करणे, अनावश्यक बाहेर जाणे टाळणे आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.