Home Breaking News कल्याण-डोंबिवलीत राजकीय वादळ; उद्धव गटाच्या ‘लापता’ नगरसेवकांमागे शिंदे गटाचा डाव?

कल्याण-डोंबिवलीत राजकीय वादळ; उद्धव गटाच्या ‘लापता’ नगरसेवकांमागे शिंदे गटाचा डाव?

22
0
ठाणे | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊनही राजकीय हालचाली थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता महापौरपदाच्या निवडीवरून सुरू असलेली रस्सीखेच अधिक तीव्र होताना दिसत असून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने १६ जानेवारीला निवडून आलेले चार नगरसेवक अचानक गायब झाल्याचा आरोप करत मोठा राजकीय खळबळ उडवून दिली आहे. या चार नगरसेवकांचे फोटो लावून “लापता कॉर्पोरेटर” असे पोस्टर शहरात झळकावण्यात आले असून, यामुळे सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले आहे.
यूबीटी गटाच्या नेत्यांचा आरोप आहे की, एकनाथ शिंदे गटाकडून या नगरसेवकांवर दबाव टाकला जात असून, सत्तासमीकरणे बदलण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’सदृश खेळी सुरू आहे. नगरसेवक निवडणूक जिंकल्यानंतर जनतेसमोर न येणे, पक्ष बैठकींना अनुपस्थित राहणे आणि संपर्क टाळणे, यामुळे संशय अधिक बळावला आहे. या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण तापले असून, महापौर कोणाचा होणार, सत्ता कोणाच्या हातात जाणार, यावर सध्या सस्पेन्स कायम आहे. एक-एक नगरसेवक महत्त्वाचा ठरत असल्याने, सर्वच पक्षांचे नेतृत्व आपल्या नगरसेवकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दुसरीकडे, शिंदे गटाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले असून, “हा आरोपांचा खेळ असून उद्धव गट आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे”, अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात नगरसेवक कुठे आहेत, ते कोणाच्या संपर्कात आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एकूणच, निकालानंतरही न थांबलेली राजकीय उलथापालथ, नगरसेवकांची ‘गायब’ अवस्था आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका यामुळे कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक राजकारण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.