तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये नवनिर्वाचित मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांचा रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने अभिनव आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सत्कार करण्यात आला. पारंपरिक पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्हांना फाटा देत तुळशीचे रोप व कापडी पिशवी देऊन करण्यात आलेल्या या सत्काराने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, हरित तळेगाव आणि शाश्वत विकासाचा प्रभावी संदेश देण्यात आला. वाढते प्रदूषण, प्लास्टिकचा अतिरेक आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. केवळ औपचारिक अभिनंदन न करता पर्यावरण जपणुकीचा ठोस आदर्श रोटरी क्लबने उभा केल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमात बोलताना रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने सांगण्यात आले की, येणारा काळ तळेगावकरांसाठी “गोल्डन सुवर्ण भविष्याचा” ठरावा, हीच सर्वांची सामूहिक भावना आहे. विकासाच्या धावपळीत पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून नगरपरिषद, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच शाश्वत विकास साध्य होऊ शकतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना क्लबचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी म्हणाले, “आजचा सत्कार हा केवळ अभिनंदनापुरता मर्यादित नसून तो पर्यावरण जतन आणि संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम आहे. विकासाच्या वाटेवर पुढे जात असताना निसर्गाचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. हरित तळेगाव, स्वच्छ तळेगाव आणि शाश्वत विकास हेच आमचे ध्येय असून नगरपरिषद, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून तळेगाव दाभाडेचे सुवर्ण भविष्य घडवूया.”
या प्रसंगी उपाध्यक्ष रो. प्रशांत ताए, सचिव रो. प्रदीप टेकवडे, ॲडमिन रो. बसप्पा भंडारी, रो. दिनेश चिखले, रो. अमेय झेंड तसेच क्लबचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनहिताच्या उपक्रमांसाठी नेहमी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी रोटरी क्लबच्या या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. नगरपरिषद व विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने तळेगाव दाभाडे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता, हरितीकरण, वृक्षारोपण आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देत काम करण्याचा ठाम संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यावरणपूरक सत्कार ही केवळ एक संकल्पना न राहता शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक दिशा ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.