मुंबई | हाउसिंग सोसायटीतील सुरक्षितता आणि रहिवाशांच्या हिताच्या दृष्टीने सोसायटीच्या प्रवेश-निर्गमन मार्गावर स्ट्रीट डॉग्सना खाऊ घालण्यास विरोध करणे चुकीचे नाही, असा अत्यंत महत्त्वाचा निर्णय बॉम्बे उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे शहरी भागातील अनेक सोसायट्यांमध्ये सुरू असलेल्या वादांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्ट्रीट डॉग्सना खाऊ घालण्यावरून उद्भवलेल्या वादात एका व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर उच्च न्यायालयाने रद्द केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, परवानगी नसलेल्या ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यास प्रतिबंध करणे हे बीएनएसच्या कलम 126 अंतर्गत गुन्हा ठरत नाही.
या प्रकरणात संबंधित हाउसिंग सोसायटीमध्ये अवघ्या ११ महिन्यांत कुत्रा चावा आणि हल्ल्यांच्या तब्बल ४० घटना घडल्या होत्या. त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता. याच पार्श्वभूमीवर एका महिलेने सोसायटी परिसरात कुत्र्यांना खाऊ घालू नये, असे सांगितल्याने वाद निर्माण झाला आणि तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
मात्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, प्राण्यांप्रती सहानुभूती आवश्यक असली तरी मानवी जीवित व सुरक्षितता यांना प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. सार्वजनिक किंवा सामायिक जागांमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय कुत्र्यांना खाऊ घालणे इतर रहिवाशांसाठी धोका निर्माण करू शकते, हे न्यायालयाने अधोरेखित केले.
हा निकाल भविष्यातील अनेक प्रकरणांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, हाउसिंग सोसायट्यांना त्यांच्या परिसरातील सुरक्षिततेसाठी नियम लागू करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, स्ट्रीट डॉग्सच्या देखभालीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकृत यंत्रणांचा सहभाग आवश्यक असल्याचेही अप्रत्यक्षपणे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे. एकूणच, प्राणीप्रेम आणि सार्वजनिक सुरक्षितता यामधील समतोल राखणे गरजेचे आहे, असा स्पष्ट संदेश बॉम्बे उच्च न्यायालयाच्या या निर्णयातून देण्यात आला आहे.