Home Breaking News विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली पंतच्या नेतृत्वाखाली मैदानात; रोहित शर्माचीही पुनरागमनाची तयारी

विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली पंतच्या नेतृत्वाखाली मैदानात; रोहित शर्माचीही पुनरागमनाची तयारी

32
0
मुंबई | क्रीडा प्रतिनिधी
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये यंदा भारतीय क्रिकेटचे दिग्गज पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही या मोसमात सहभाग नोंदवला असून, त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची रंगत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
रोहित शर्मा मुंबई संघाकडून खेळणार असून, तर विराट कोहली दिल्ली संघाकडून मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे, दिल्ली संघाची धुरा ऋषभ पंतकडे देण्यात आली असून विराट कोहली पंतच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळणार आहे. युवा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू यांची ही जोडी क्रिकेटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरली आहे.
शुक्रवारी मुंबई आणि दिल्ली क्रिकेट संघटनांनी आपापले अधिकृत संघ जाहीर केले, ज्यामध्ये या दोन्ही स्टार खेळाडूंचा समावेश आहे. निवड जाहीर होताच रोहित आणि विराट यांनी मुंबईत सरावाला सुरुवात केली आहे. दोघेही नेट्समध्ये मेहनत घेताना दिसत असून, देशांतर्गत स्पर्धेला ते किती गांभीर्याने घेत आहेत, हे यातून स्पष्ट होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा प्रारंभीच्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे, मात्र त्यानंतर तो संघात सहभागी होणार आहे. दीर्घ काळानंतर रोहित आणि विराट दोघेही विजय हजारे ट्रॉफीत खेळत असल्याने, युवा खेळाडूंना त्यांचा अनुभव मिळण्याची मोठी संधी आहे.
या स्पर्धेत राष्ट्रीय संघात पुनरागमन, फिटनेस आणि फॉर्म सिद्ध करण्याच्या दृष्टीने हा मोसम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची कामगिरी निवड समिती आणि चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेणार आहे. देशांतर्गत क्रिकेटला मिळणारा हा स्टारडमचा टच स्पर्धेला नवी उंची देईल, यात शंका नाही.