मावळ – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या साहित्यकौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारा एक अनोखा उपक्रम मावळ तालुक्यात राबविण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद, मावळ तालुका यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘परीघ’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. साहित्याची जाण आणि भावविश्वाला शब्द देण्याची क्षमता ग्रामीण भागातही किती विपुल आहे याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपादक सुरेश साखोळकर असून, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, तसेच मराठी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला बहार आणणारी ठरली. शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून साहित्याच्या या पर्वाला साक्षीदार झाला.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या 52 कवितांचा अप्रतिम संग्रह मावळ टाकी तालुक्यातील मळवंडी ढोरे, करूंज, निगडे, सांगिसे, तळेगाव, कामशेत आणि इतर दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या जगण्यातील अनुभव, भावना आणि निरीक्षणांना कवितांच्या रूपात व्यक्त केले आहे. आई, बाबा, शाळा, भारत, शेतकरी जीवन, मातृभूमी, निसर्ग, मोबाईल, गावातील बदल, जलसंवर्धन यांसारख्या विविध विषयांवर लिहिलेल्या 52 कविता या अंकात समाविष्ट आहेत. या कविता केवळ बालवाड्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रतिबिंब नसून, ग्रामीण संवेदना, मातीचा सुगंध आणि मुलांच्या निर्मळ मनातील भावना व देशप्रेम यांचा सुंदर मेळ या संग्रहात पाहायला मिळतो.
बाल साहित्य संमेलनाची घोषणा – निसर्गाच्या सान्निध्यात एक नवीन पर्व विद्यार्थ्यांच्या लेखनातील निर्मळता आणि संवेदनशीलता पाहून प्रभावित झालेल्या अध्यक्ष सुरेश साखोळकर यांनी एक मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले – “मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील उदयोन्मुख बाल साहित्यिकांसाठी आपण लवकरच निसर्गाच्या सान्निध्यात भव्य ‘बाल साहित्य संमेलन’ आयोजित करू. मुलांच्या कल्पनाशक्तीला निसर्गाची जोड मिळाल्यास साहित्य निर्मिती अधिक बहरदार होते.”
ही घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण झाला. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मिळालेली ही नवी संधी भविष्यात अनेक नव्या साहित्यिकांची पिढी घडवेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमाचे आयोजन ज्योती भोई आणि अन्सारी यांनी केले. शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना लेखनाचे प्रोत्साहन देत त्यांच्या कवितांचे संकलन करून परीघ दिवाळी अंक साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामीण भागातील अशा साहित्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असून, शिक्षणाबरोबरच संस्कार आणि कलाविकासाला प्रोत्साहन मिळत आहे.
साहित्य, संस्कार आणि निसर्ग यांचा संगम ‘परीघ’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या लेखनकुशलतेला नवे वलय प्राप्त झाले असून, आगामी बाल साहित्य संमेलनामुळे निसर्गरम्य मावळ तालुका लवकरच बाल साहित्याचा उत्सव साजरा करणार आहे.