Home Breaking News पुण्यात 8व्या अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दिमाखदार सुरुवात; देश-विदेशातील 70...

पुण्यात 8व्या अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दिमाखदार सुरुवात; देश-विदेशातील 70 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन

82
0
पुणे : चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, संघर्ष आणि परिवर्तनाची ताकद प्रभावीपणे मांडणारा 8वा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – 2025 दिनांक 26 ते 28 डिसेंबर दरम्यान पुण्यात उत्साहात पार पडत आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र फिल्म, रंगमंच व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने, अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती आणि निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचा भव्य उद्घाटन समारंभ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI), लॉ कॉलेज रोड, पुणे येथे पार पडला. ज्येष्ठ लेखक व संपादक महावीरभाई जोंधळे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी ‘तुम्बाड’ फेम आणि आगामी ‘मायासभा’ चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भारतासह विविध देशांतील एकूण 70 निवडक चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येत असून, सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत चित्रपटप्रेमींना चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये आशयघन, सामाजिक वास्तव मांडणारे, प्रयोगशील आणि जागतिक पातळीवरील पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा समावेश आहे.
चित्रपट प्रदर्शनासोबतच दिग्दर्शकांशी संवाद, विशेष फिल्म चर्चा सत्रे, वैचारिक परिसंवाद यांचेही आयोजन करण्यात आले असून, प्रेक्षकांना चित्रपटांच्या पलीकडे जाऊन विचारमंथनाची संधी मिळत आहे. प्रख्यात दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या ‘सुवर्णरेखा’ या चित्रपटावर विशेष चर्चा सत्र हे महोत्सवाचे महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे.
महोत्सवाचा समारोप नितेश हेगडे दिग्दर्शित ‘वाघाची पहाणी (Tiger’s Pond)’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. तसेच यावर्षीचा मानाचा ‘निळुभाऊ फुले कलाकार-कार्यकर्ता पुरस्कार – 2025’ सामाजिक भान जपणारे लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रख्यात नाटककार, लेखक, प्राध्यापक व अभिनेते प्रो. सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
महोत्सवाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित AI चित्रप्रदर्शनी, जी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. सामाजिक जाणीव जागवणाऱ्या चित्रपटांचा हा महोत्सव पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात एक महत्त्वाचा ठेवा ठरत असून, राज्यभरातील व देशभरातील सिनेप्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.