पुणे शहरात वन्यजीवांच्या हालचालींची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी पहाटे पुन्हा एकदा पाषाण आणि सुतारवाडी परिसरात बिबट्याचे स्पष्ट दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पहाटे 4:12 वाजता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये बिबट्या गाड्यांच्या मध्ये सहज फिरताना दिसला. काही सेकंदांच्या दुसऱ्या फुटेजमध्ये तो इमारतीच्या गेटवर झेप घेत कंपाऊंडच्या आत शिरताना कॅमेऱ्यात कैद झाला.
वन विभागाची पुष्टी – निगराणी सुरू
सहायक वनसंरक्षक मंगेश टाटे यांनी ही घटना खरी असल्याची पुष्टी दिली.
“हो, दर्शन झाले आहे… संपूर्ण परिसरात सतत सर्व्हिलन्स सुरू आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
वन विभागासोबतच ResQ Charitable Trust चे तज्ज्ञही शोधमोहिमेत सहभागी झाले असून परिसरात ट्रॅप केजेस बसवण्यात आल्या आहेत. सकाळ–सायंकाळ वॉकला जाणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असेही अधिकाऱ्यांचे आवाहन आहे.
खोटी AI-निर्मित चित्रे व्हायरल करू नका – अधिकाऱ्यांची सूचना
घटनानंतर सोशल मीडियावर अनेक फेक AI-जनरेटेड बिबट्यांचे फोटो फिरू लागले. याबाबत वन विभागाने स्पष्ट सूचना दिली आहे की अशा अफवा किंवा बनावट चित्रे पसरवू नयेत. अनावश्यक भीती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
याआधीही पुण्यात बिबट्याची हालचाल
गेल्या महिन्यात पुणे विमानतळ परिसर, आंबेडकर कॉलनी, RBI कॉलनी, सिंध सोसायटी, औंध या भागांतही बिबट्याचे दर्शन झाले होते.
-
19 नोव्हेंबर – पुणे विमानतळ परिसर
-
23 नोव्हेंबर – औंध
-
25 नोव्हेंबर – पुन्हा विमानतळ परिसर
तेव्हापासून औंध आणि विमानतळ परिसरात नवीन हालचाल आढळली नव्हती. मात्र पाषाण–सुतारवाडीतील ताज्या घटनेने पुन्हा एकदा वन्यजीव-मानव संघर्षाचा मुद्दा समोर आला आहे.
नागरिकांनी काय करावे?
-
घाबरू नका, शांत राहा
-
मुलांना आणि पाळीव प्राण्यांना मुक्त सोडू नका
-
सकाळ–सायंकाळ एकटे फिरणे टाळा
-
कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास वन विभागाला तात्काळ कळवा
