पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर परिसर पुन्हा एकदा दुर्दैवी घटनेने हादरला आहे. दुर्गा रेसिडेन्सी परिसरात पाण्याच्या टाकीत पडून एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी उघडकीस आली. मृत महिला आशा संजय गवळी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा गवळी या आज सकाळी पिण्याचे पाणी भरण्यासाठी टाकीजवळ गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन त्या थेट पाण्याच्या टाकीत पडल्या. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला याबाबत कळवले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत टाकीतून मृतदेह बाहेर काढला आणि वाईसीएम हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आशा गवळी यांच्या मुलाचे लग्न अवघ्या दोन दिवसांवर — ४ नोव्हेंबर रोजी होणार होते. परंतु त्याआधीच आईचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या तयारीने घरात सुरू असलेली आनंदाची लगबग एका क्षणात शोकात रूपांतरित झाली.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. नागरिकांनी अशा पाण्याच्या टाक्या सुरक्षित ठेवाव्यात आणि योग्य झाकण लावण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.