Home Breaking News हिमालयाचा तब्बल ८६% भाग बर्फाच्छादित; मध्यप्रदेश–राजस्थानमध्ये रात्रीचे तापमान १५°C पर्यंत खाली

हिमालयाचा तब्बल ८६% भाग बर्फाच्छादित; मध्यप्रदेश–राजस्थानमध्ये रात्रीचे तापमान १५°C पर्यंत खाली

33
0
देशात यंदा विक्रमी थंडीचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण, यावर्षी हिमालय पर्वतरांगांचा तब्बल ८६% भाग दोन महिने आधीच बर्फाच्या पांघरुणाखाली गेला आहे. यामुळे उत्तर भारतासह मध्य आणि पश्चिम भारतात थंडीची लाट लवकरच तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अलीकडील वेस्टर्न डिस्टरबन्समुळे (Western Disturbance) हिमालय परिसरातील तापमान २ ते ३ अंशांनी घटले आहे. त्यामुळे नव्याने पडलेली बर्फवृष्टी वितळत नसून ती अधिक घट्ट होत आहे. ही परिस्थिती डिसेंबरपर्यंत कायम राहिल्यास थंडीचा जोर विक्रमी पातळीवर पोहोचू शकतो.
डिसेंबर महिन्यात ‘ला नीना’ ही हवामानातील नैसर्गिक प्रक्रिया सक्रीय होणार आहे. ही प्रक्रिया प्रशांत महासागराचे तापमान सामान्यपेक्षा थंड बनवते, ज्यामुळे भारतात अधिक पाऊस आणि अधिक थंडी अनुभवायला मिळते. हवामान तज्ञांच्या मते, याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पूर्व भारतावर होणार आहे.
सध्या हिमालयाच्या उंच भागात (४ हजार फूटांपेक्षा अधिक) सरासरी तापमान -१५°C किंवा त्याहूनही कमी आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागात रात्रीचे तापमान ३–४ अंशांनी आणखी खाली जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.
मध्यप्रदेशमध्ये थंडीने वेळेआधीच हजेरी लावली आहे. भोपालमध्ये किमान तापमान १५.८°C इतके नोंदवले गेले असून ते सरासरीपेक्षा तब्बल ३.६°C ने कमी आहे. गेल्या २६ वर्षांत ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात इतके कमी तापमान तिसऱ्यांदा नोंदवले गेले आहे. राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही रात्रीच्या गारव्याने लोकांना स्वेटरकडे वळण्यास भाग पाडले आहे.
यंदाची थंडी ११० वर्षांतील तिसऱ्या क्रमांकाची तीव्र थंडी ठरण्याची शक्यता असून, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत देशभरात गारठ्याची तीव्रता विक्रमी पातळीवर पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.