पुणे जिल्ह्यातील क्रीडा विश्वात ऐतिहासिक क्षण घडणार आहे! येत्या १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही भव्य आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पार पडणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्पर्धेचा लोगो, जर्सी आणि मॅस्कॉट यांचे अनावरण करण्यात आले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, एशियन सायकलिंग कॉन्फेडरेशन आणि युनियन सायक्लिस्त इंटरनॅशनल (UCI) या संस्थांमध्ये सुसंवाद साधण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले की, संपूर्ण स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांकडून समन्वय केला जात आहे.
स्पर्धा एकूण ४३७ किमी अंतरावर आयोजित करण्यात येणार असून, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नऊ तालुक्यांतील सुमारे २५० गावे या मार्गावरून जाणार आहेत. ही स्पर्धा चार टप्प्यांमध्ये पार पडेल, ज्यातील प्रत्येक टप्पा सुमारे १०० किमी अंतराचा असेल. ही स्पर्धा ५ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृतरीत्या UCI कॅलेंडरमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, २१० आंतरराष्ट्रीय सायकलिंग फेडरेशन्सना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. आतापर्यंत २५ देशांमधील संघांनी सहभागाची इच्छा व्यक्त केली आहे. UCI 2.2 श्रेणीतील या स्पर्धेत २४ संघ, प्रत्येकी ४ खेळाडूंनी म्हणजेच एकूण १७६ सायकलपटू सहभागी होणार आहेत.
स्पर्धेपूर्व तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी २८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या आयोजनासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, PMRDA, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य व क्रीडा विभाग यांचा समावेश असलेल्या अनेक समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेला बजाज ऑटो, सीरम इन्स्टिट्यूट, चितळे ग्रुप आणि पंचशील ग्रुप यांसारख्या नामांकित कंपन्यांनी प्रायोजकत्व दिले आहे.
जिल्हाधिकारी डूडी यांनी सांगितले की, “या स्पर्धेचा उद्देश केवळ खेळापुरता मर्यादित नाही. हा उपक्रम पर्यावरणपूरक वाहतुकीचा प्रचार, निरोगी जीवनशैलीला चालना, पायाभूत सुविधांचा विकास, आणि पुणे जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर अग्रभागी आणणे हा आहे.” पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे पुण्याचे नाव जागतिक पातळीवर झळकणार असून, हा उपक्रम ‘स्पोर्ट्स सिटी’ बनण्याच्या दिशेने पुण्याचा मोठा टप्पा ठरेल.