Home Breaking News दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत सानुग्रह अनुदान, वेतनवाढीचा फरक...

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत सानुग्रह अनुदान, वेतनवाढीचा फरक आणि अग्रीम देण्याचा निर्णय

31
0
मुंबई | दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक दिल्यानंतर सरकारकडून तत्काळ पावले उचलण्यात आली आहेत. सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक घेण्यात आली.
या महत्त्वाच्या बैठकीत एसटी कर्मचारी संघटना आणि कृती समितीच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून विविध मागण्या मांडल्या. चर्चेनंतर सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची भेट दिली आहे.
बैठकीतील प्रमुख निर्णय:
एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
२०२० ते २०२४ दरम्यानच्या वेतनवाढीचा फरक दरमहा वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला ६५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये दिवाळी अग्रीम देण्यात येणार असून, यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “सरकार कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर करते. सणासुदीच्या काळात कोणत्याही कर्मचाऱ्याला आर्थिक अडचण भासू नये, म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी आनंदाने दिवाळी साजरी करतील, यासाठी शासन कटिबद्ध आहे.”
या बैठकीला उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर आणि विविध एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत संपाच्या इशाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सखोल चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रवासी वर्गालाही दिलासा मिळणार आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील एसटी सेवा नियमित राहणार असून, सणासुदीच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागांतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. हा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांसाठी “दिवाळी गिफ्ट” ठरला आहे.