Home Breaking News कोल्हापुरात सलग मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कोल्हापुरात सलग मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

54
0
कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक वसतिगृहांमधील हिंसाचाराच्या घटनांनी सर्वत्र खळबळ उडवली आहे. तळसंदे येथे एका निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तपास सुरू केला होता, आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पेठवडगाव परिसरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्याला बाथरूममध्ये नेऊन निर्दयीपणे मारहाण करण्यात येत असल्याचं दिसतं आहे.
या सलग घटनांमुळे जिल्ह्यातील पालकवर्ग आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिक्षणसंस्थांमधील सुरक्षा आणि शिस्त याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणी महत्त्वाचं आवाहन करताना सांगितलं की, “अल्पवयीन मुलांवर चौकशी सुरू असून कोणतीही भीती न बाळगता अशा घटना पोलिसांपर्यंत तात्काळ पोहोचवा.”
तळसंदे येथील व्हिडिओ एप्रिल महिन्यातील असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी त्यात बेल्ट, बॅट आणि दांडक्यांनी लहान मुलांवर झालेल्या मारहाणीचे दृश्य संतापजनक आहेत. या घटनेत एक विद्यार्थी जखमी असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित रेक्टरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पेठवडगावमधील नवीन व्हिडिओमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शैक्षणिक संस्थांची जबाबदारी अधोरेखित करण्यात येत आहे. अनेक पालकांनी प्रशासनाला आवाहन केलं आहे की, वसतिगृह आणि शाळांमधील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यात यावी.
दरम्यान, जिल्हा शिक्षण अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने अनधिकृत वसतिगृह आणि शैक्षणिक संस्थांची तपासणी सुरू केली असून, विद्यार्थ्यांना योग्य संस्कार व सुरक्षित वातावरण देण्यासाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
या घटनांनी स्पष्ट केलं आहे की, शैक्षणिक परिसरात शिस्त आणि आदर यांची गरज अधिक वाढली आहे. प्रशासनाने आश्वासन दिलं आहे की, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील.