Home Breaking News कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांची प्रेरणा – शिवशंभो प्रतिष्ठानला “मोरया पुरस्कार” द्वितीय क्रमांकाने सन्मानित

कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांची प्रेरणा – शिवशंभो प्रतिष्ठानला “मोरया पुरस्कार” द्वितीय क्रमांकाने सन्मानित

51
0
पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सव हा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक जाणीवा रुजवणारा उत्सव मानला जातो. याच परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा “मोरया पुरस्कार सोहळा” यंदाही अत्यंत उत्साहात पार पडला.
निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्यासह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
सन २०२४ च्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला असून, मोशी येथील शिवशंभो प्रतिष्ठानला द्वितीय क्रमांकाचा “मोरया पुरस्कार” मिळाला आहे. या संस्थेने गेल्या २० वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, स्वच्छतेची चळवळ, गरजूंपर्यंत मदत, संस्कृती व परंपरेचे जतन अशा उपक्रमांद्वारे शहरात वेगळी छाप पाडली आहे.
या प्रसंगी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा कर्तव्यदक्ष, दूरदृष्टीपूर्ण व सामाजिक जाणीव असलेला दृष्टिकोन अधोरेखित झाला. कायदा व सुव्यवस्था राखणे हे त्यांचे प्रमुख कार्य असले तरी सामाजिक उपक्रमांना चालना देणे, नागरिकांमध्ये ऐक्य वाढवणे, गणेशोत्सवासारख्या परंपरेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे हे देखील त्यांच्या कार्यपद्धतीचे महत्त्वाचे अंग असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
श्री. चौबे यांनी आपल्या भाषणात सांगितले – “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर समाजाच्या प्रगतीचा आणि एकतेचा मार्ग आहे. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन हा उत्सव बंधुभाव आणि सामाजिक सलोखा निर्माण करतो. समाजातील सकारात्मक उपक्रमांना पोलीस प्रशासन नेहमीच पाठिंबा देईल.”
शिवशंभो प्रतिष्ठानचे पदाधिकारी पुरस्कार स्विकारताना भावूक झाले. त्यांनी सांगितले – “हा सन्मान केवळ गौरव नाही तर एक जबाबदारी आहे. श्री. विनयकुमार चौबे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रमांबद्दलची त्यांची सकारात्मक दृष्टी आम्हाला पुढे काम करण्यासाठी प्रेरित करेल.”
या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनीही असे मत व्यक्त केले की, पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक सलोखा, सुरक्षित वातावरण आणि प्रगतिशील उपक्रमांचा संगम हे आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे शक्य झाले आहे.