Home Breaking News अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा! ७ जिल्ह्यांना १३५६ कोटींची आर्थिक मदत;...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा! ७ जिल्ह्यांना १३५६ कोटींची आर्थिक मदत; शासन निर्णय जारी

45
0
मुंबई : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयाची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय आज, दि. १७ ऑक्टोबर २०२५, निर्गमित करण्यात आला. या निर्णयामुळे एकूण २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांना आणि १५ लाख १६ हजार ६८१.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना आर्थिक मदतीचा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्याला किती मदत?
  • सातारा: ११,११३ शेतकरी | ४,२१९.२८ हेक्टर | ₹६.२९ कोटी
  • कोल्हापूर: ५,८६० शेतकरी | १,६९६.३६ हेक्टर | ₹३.१८ कोटी
  • बीड: ८,०६,५१३ शेतकरी | ६,४४,९१८.५५ हेक्टर | ₹५७७.७८ कोटी
  • धाराशिव: ४,०४,६५६ शेतकरी | ३,११,२९१.२३ हेक्टर | ₹२९२.४९ कोटी
  • लातूर: ४,१५,४९२ शेतकरी | २,३०,६२८.९९ हेक्टर | ₹२०२.३८ कोटी
  • परभणी: ४,३९,२९७ शेतकरी | २,८५,८५३.७८ हेक्टर | ₹२४५.६४ कोटी
  • नांदेड: ८३,२६७ शेतकरी | ३२,०७३.०२ हेक्टर | ₹२८.५२ कोटी
मकरंद पाटील यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच वितरित केली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया टाळली जाईल आणि पीडितांना त्वरित मदत मिळेल.
तसेच, मृत व्यक्तींच्या वारसांना, पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांनाही जिल्हा प्रशासनामार्फत तत्काळ आर्थिक मदत दिली जाईल.
राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत असून, अनेक ग्रामीण भागात यामुळे नवीन आशेची किरणे दिसू लागली आहेत. सरकारने दिलेला हा मदतीचा हात शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.