Home Breaking News “अतिक्रमण काढा, आमची वाहनं असली तरी काढा!” — अजित पवारांचा अधिकाऱ्यांना कडक...

“अतिक्रमण काढा, आमची वाहनं असली तरी काढा!” — अजित पवारांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा; पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम वेगाने सुरू होणार!

78
0
पिंपरी-चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यादरम्यान अतिक्रमणविरोधी कारवाईबाबत अधिकाऱ्यांना कडक आणि स्पष्ट निर्देश दिले. त्यांनी “अतिक्रमण काढा, आमची वाहनं असली तरी काढा; पण आजच झालं पाहिजे!” या शब्दांत प्रशासनाला ठाम आदेश देत अतिक्रमणविरोधी मोहिमेला गती देण्याचे आदेश दिले.
शहरात रस्ते आणि फुटपाथवर वाढत चाललेल्या अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे अजित पवारांनी गंभीरपणे लक्ष वेधले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, या मोहिमेत कोणत्याही राजकीय दबावाला वा हस्तक्षेपाला स्थान दिलं जाणार नाही. प्रशासनाने पक्षपाताशिवाय, नियमांनुसार आणि काटेकोरपणे अतिक्रमण हटवावं, असे निर्देश त्यांनी दिले.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना उद्देशून अजित दादांनी सांगितले की, “शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी हा निर्णय आवश्यक आहे. आमची स्वतःची वाहने अडथळा ठरत असतील, तरी ती सुद्धा हटवा. प्रशासनाने ठाम भूमिका घेतली पाहिजे.”
त्याचबरोबर पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान अजित पवारांनी अधिकाऱ्यांना आणि जनप्रतिनिधींना प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “मंत्रालयात बसून समस्या कळत नाहीत. मैदानात जाऊन, नागरिकांशी बोलून आणि कामं पाहूनच खरी परिस्थिती समजते. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला नेहमीच ‘एक राउंड मारला पाहिजे’.”
या दौऱ्यादरम्यान त्यांनी मेट्रो कामांच्या गतीचा आढावा घेतला आणि प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यांवरील अडथळे दूर करून शहर अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.