नवी दिल्ली : राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२५ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निकालांनुसार, दिल्ली विद्यापीठातील प्रतिष्ठित हिंदू कॉलेज देशातील सर्वोत्कृष्ट कॉलेज ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपासून ते संशोधन, शिक्षकवर्ग, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व बाबींवर आधारित मूल्यमापन करून हा निकाल जाहीर झाला आहे.
दरवर्षी जाहीर होणाऱ्या या रँकिंगकडे संपूर्ण देशातील विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्था उत्सुकतेने पाहतात. यावर्षीही IIT मद्रासने आपली परंपरा कायम ठेवत ओव्हरऑल कॅटेगरीत पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे. तंत्रज्ञान, संशोधन, नवनवीन प्रकल्प, जागतिक पातळीवरील मान्यता आणि उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण यामुळे IIT मद्रासने आपली अव्वल ओळख अधिक मजबूत केली आहे.
यंदाच्या रँकिंगमध्ये एकूण १७ वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये विद्यापीठे, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वैद्यकीय, कायदा, फार्मसी, आर्किटेक्चर, संशोधन संस्था अशा विविध विभागांचा समावेश आहे. प्रत्येक कॅटेगरीत स्पर्धा अत्यंत तीव्र झाली असून देशातील अग्रगण्य संस्थांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
हिंदू कॉलेजच्या यशामुळे दिल्ली विद्यापीठाचा मान वाढला असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे IIT मद्रासने पुन्हा एकदा सिद्ध केले की, संशोधन आणि इनोव्हेशन या क्षेत्रात ते देशातील अव्वल मानक आहेत. शिक्षण क्षेत्रात वाढत्या स्पर्धेत ही रँकिंग संस्थांना स्वतःला अधिक सक्षम करण्यासाठी प्रेरणा देणारी ठरत आहे.