पुणे : गेल्या दहा वर्षांपासून गणेश पेठ येथील मच्छी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या छातीवर दहशतीची सावली टांगलेली होती. पोलिसांच्या कसून तपासानंतर अखेर हा गूढ उलगडले असून बंडू आंदेकर व त्याच्या कुटुंबीयांचा खंडणीचा कारनामा उघड झाला आहे. व्यापाऱ्यांकडून तब्बल २० कोटींहून अधिक रकमेची खंडणी उकळल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
या प्रकरणी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज उदयकांत आंदेकर या सहा जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरमहा १५ ते २० लाख रुपयांची खंडणी उकळत व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली होती, असा आरोप आहे.
गेल्या काही वर्षांत व्यापाऱ्यांनी याविषयी आवाज उठवायचा प्रयत्न केला, मात्र धमक्यांच्या छायेत कोणीही पुढे येण्यास धजावत नव्हते. मात्र पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या तक्रारींवर कारवाई करताच खंडणी प्रकरणाचा हा प्रचंड घोटाळा उघड झाला.
या प्रकरणामुळे मत्स्यव्यवसायात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांच्या हालअपेष्टा आता प्रकाशझोतात आल्या आहेत. खंडणीच्या या साखळीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचेही सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी चौकशी सुरू असून अजून काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. आंदेकर कुटुंबाच्या या कारनाम्यामुळे पुणेकरांमध्ये संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.