नवी दिल्ली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या कडक कारवाई व सततच्या मोहीमा यामुळे देशातील नक्षलवाद्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. अलीकडेच काही वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ते आता शांती चर्चेत सहभागी होण्यास आणि शस्त्रं खाली ठेवण्यास तयार आहेत.
गेल्या अनेक दशकांपासून नक्षलवादामुळे प्रभावित असलेल्या छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये सरकारच्या सुरक्षादलांनी सातत्याने मोहिमा राबवल्या. यात नक्षलवाद्यांचे जाळे मोडून काढण्यात मोठे यश मिळाले आहे. यामुळे नक्षलवाद्यांची संपूर्ण रणनीती कोलमडली असून ते आता चर्चेच्या मार्गावर येण्याची भाषा करत आहेत.
गृह मंत्रालयाने याबाबत सकारात्मक संकेत दिले असून, जर नक्षलवादी खरोखरच शांती प्रक्रियेसाठी पुढे येतील तर त्यांना समाजात पुनर्वसनाची संधी दिली जाईल, असे संकेत मिळाले आहेत. मात्र, सरकारने हेही स्पष्ट केले आहे की, हिंसा थांबवूनच संवाद साधला जाईल.
नागरिकांमध्ये या घडामोडींमुळे मोठा दिलासा व आनंद आहे. अनेकांना वाटते की, जर शांती चर्चेचा मार्ग खुला झाला तर जंगल भागातील सामान्य जनता हिंसा व भीतीच्या छायेतून मुक्त होईल आणि विकासाला गती मिळेल.
तज्ज्ञांच्या मते, सरकारच्या ठाम भूमिकेमुळेच आज नक्षलवादी माघार घ्यायला तयार झाले आहेत. हा निर्णय पुढील काळात भारतासाठी शांती व प्रगतीचा नवा अध्याय ठरू शकतो.