Home Breaking News “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रमात दोन हजारांहून...

“श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रमात दोन हजारांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

31
0
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” या स्वच्छता उपक्रमाने आज निगडीतील भक्ती शक्ती चौकात स्वच्छतेचा महाउत्सव उभा केला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात दोन हजारांहून अधिक नागरिकांनी एकत्र येत “स्वच्छतेची शपथ” घेतली आणि आपल्या हातांनी शहर स्वच्छतेसाठी योगदान दिले. या मोहिमेतून जवळपास १२ टन कचरा गोळा करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसर चकाकून निघाला.
या उपक्रमाचा शुभारंभ आमदार उमा खापरे आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाला. त्यावेळी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय टीम, विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले,“स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी-चिंचवडने राज्यात प्रथम क्रमांक आणि देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. हे यश सफाई मित्रांचे आहे. २०२५-२६ मध्ये आपण देशात अग्रेसर यावे, यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा आहे.”
स्वच्छतेची शपथ
नागरिकांनी स्वच्छ भारत मिशनप्रमाणे “दरवर्षी १०० तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान” करण्याची शपथ घेतली. ही शपथ “मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही” या विचारांनी भरलेली होती.
सांस्कृतिक रंगतही अनुभवली
‘फिट माय सिटी’ ग्रुपच्या वतीने झुंबा कार्यक्रम झाला, ज्यात नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद
भक्ती शक्ती चौकात आयोजित स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आयुक्त शेखर सिंह यांनी स्वाक्षरी करून “स्वच्छता ही सेवा” असा संदेश दिला.
नवीन ब्रँड ॲम्बेसिडरची घोषणा
२०२५ साठी महापालिकेने नवीन स्वच्छता ब्रँड ॲम्बेसिडर जाहीर केले. शहरस्तरावर आर.जे. बंड्या यांची निवड झाली असून विविध प्रभागांमधून पवन शर्मा, मोहन गायकवाड, अरविंद भोसले, डॉ. नंदकुमार धुमाळ, विलास नाईकनवरे, मनीषा राठोड, अदिती निकम आदींना सन्मानित करण्यात आले. हे सर्व जण शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहेत.
 महापालिकेच्या या उपक्रमातून स्पष्ट झाले की स्वच्छतेबाबतची चळवळ आता नागरिकांची बनली आहे. शाळकरी विद्यार्थी असोत किंवा ज्येष्ठ नागरिक, सर्वांनी एकत्र येऊन शहर स्वच्छतेचा संकल्प अधिक मजबूत केला आहे.