Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन – स्थापत्यकलेचा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन – स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना पुणेकरांच्या सेवेत

45
0
पुणे :- पुणेकरांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, “हा पूल केवळ प्रवास सुलभ करणारा नसून, स्थापत्यकलेचा एक आदर्श नमुना आहे. पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला अधोरेखित करणारी ही रचना खऱ्या अर्थाने शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे तसेच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुलाचे वैशिष्ट्य
या पुलाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतातील पहिला ७० डिग्री कोनात कललेला काँक्रीटचा पायलन या पुलात उभारण्यात आला आहे. पुलाचा भार सांभाळण्यासाठी उच्च तणावक्षमता असलेल्या २० केबल्स बसविण्यात आल्या आहेत. पुलाची एकूण लांबी १७९.७९१ मीटर, तर रुंदी ८ मीटर आहे. अत्याधुनिक केबल-स्टेड ब्रिज या तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल उभारण्यात आला आहे.
या पुलामुळे शनिवार पेठ, नारायण पेठ आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मुठा नदी ओलांडून थेट छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकात पोहोचणे अत्यंत सुलभ झाले आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांचा वेळ वाचेल आणि मेट्रो सेवांचा वापरही वाढणार आहे.
पर्यावरणपूरक रचना
या पुलासाठी नदीपात्रात फक्त दोनच खांब उभारले गेले आहेत, ज्यामुळे नदीच्या प्रवाहाला कोणताही अडथळा येणार नाही. ही बाब पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. पुलाजवळ बालगंधर्व रंगमंदिर असल्याने पुण्याच्या सांस्कृतिक वारशाशी सुसंगत रचना केली आहे. पुलाची रचना तानपुऱ्यासारखी करण्यात आली असून त्यात अभियांत्रिकी आणि कलेचा अनोखा संगम साधण्यात आला आहे.
पुणे मेट्रोच्या प्रगतीतील महत्त्वाचे पाऊल
पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत वनाझ ते रामवाडी मार्गावर दोन पुलांची योजना होती. यापैकी छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ हा पादचारी पूल पूर्णत्वास गेला असून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांत दुसऱ्या पुलाचेही काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
या पुलामुळे पुण्यातील नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि जलद वाहतूक व्यवस्थेचा नवा अनुभव मिळणार आहे.