Home Breaking News परराज्यातील कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक – १ लाख ५ हजारांचा...

परराज्यातील कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक – १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

42
0
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत परराज्यातील बांधकामावर काम करणाऱ्या गरीब मजुरांचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून पोलिसांनी मोठा यश मिळवले आहे. या कारवाईत एकूण १,०५,०००/- रुपये किमतीचे ०८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
५ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास, अर्जुन निर्मल चौहान (वय २९, मूळ रा. उत्तर प्रदेश) व इतर सहकारी कामगार झोपेत असताना, तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या झोपडीत घुसून ४ मोबाईल फोन, अंदाजे ४०,०००/- रुपये किमतीचे, चोरी केले. कामगारांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली, मात्र चोरटे मोबाईल घेऊन पळून गेले. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली आणि परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. या वेळी दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.
तपासाच्या पुढील टप्प्यात आरोपींकडून चौकशी केली असता त्यांनी अशा प्रकारचे अनेक गुन्हे रांजणगाव एमआयडीसी व शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत केल्याचे उघड झाले. त्यांच्या कडून अतिरिक्त ६५,०००/- रुपये किमतीचे ४ मोबाईल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे एकूण दोन घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोसई ए. सी. थोरात, सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे, पो. हवा राजेश ढगे, पो. हवा नितिन भोस, पो. का. गणेश वाघ, पो. का. उमेश कुतवळ, पो. का. योगेश गुंड, पो. का. किशोर शिवणकर व पो. का. संदीप भांड यांनी विशेष परिश्रम घेतले. तपास सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे व पो. हवा अभिगान कोळेकर करत आहेत.
या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पोलिसांच्या या वेळीच्या जलद कारवाईमुळे परराज्यातून उपजीविकेसाठी आलेल्या गरीब मजुरांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. वारंवार मोबाईल चोरीच्या घटनांमुळे अस्वस्थ झालेले कामगार आता निश्चिंत झाले आहेत.