Home Breaking News चिखलीतील खाणीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

चिखलीतील खाणीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

39
0
पिंपरी-चिंचवड परिसरात आणखी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तळवडे येथील मनोज चव्हाण (वय १७) या तरुणाचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ९ सप्टेंबर) दुपारी घडली असून त्याचा मृतदेह मंगळवारी दुपारी आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सोमवारी आपल्या मित्रांसोबत चिखलीतील शेलार वस्ती परिसरातील खाणीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो अचानक पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना काय करावे ते सुचेना. घाबरलेल्या मित्रांनी तेथून पळ काढला आणि त्यांनी ही बाब कोणालाही सांगितली नाही.

दरम्यान, घरी परत न आल्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याच्या मित्रांनी सत्य सांगितले. तात्काळ चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे दीड वाजता मनोजचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेमुळे तळवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लहान मुलांनी किंवा तरुणांनी जीव धोक्यात घालून खाणी, नदी किंवा तलावात पोहण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोहण्यासाठी सुरक्षित जागा आणि योग्य देखरेखीशिवाय पाण्यात उतरणे जीवघेणे ठरू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.