संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात गणेशोत्सव जल्लोषात, भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र या जल्लोषाच्या वातावरणात मोठमोठ्या आवाजात वाजणारे ढोल-ताशे आणि गाण्यांच्या गजरामुळे त्रास होत असल्याची तक्रार ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेत्री कशिश कपूर हिने केली आहे. कशिशने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना स्पष्ट शब्दांत मांडल्या आहेत.
तिने सांगितले की, “मी 20 व्या मजल्यावर राहते. माझ्या घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद आहेत. तरीदेखील खाली वाजवले जाणारे ढोल-ताशे इतक्या मोठ्या आवाजात आहेत की तो सरळ माझ्या डोक्यात घुसतो. तीन तासांपेक्षा जास्त वेळ हा त्रास सहन करावा लागला. भक्ती करायची आहे, उत्सव साजरा करायचा आहे, याला मी विरोध करत नाही. पण भक्तीचा मार्ग असा असावा की ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही.”
कशिश कपूरने यावेळी स्पष्टपणे सांगितले की, “आनंद साजरा करायचा असेल तर इतरांच्या डोक्याला त्रास न देता करा. त्रास देऊन भक्ती होत नाही. यावरून काही जण माझ्या विरोधात शिव्या देतील, हे मला माहीत आहे. पण माझा मुद्दा समजून घ्या.”
तिच्या या विधानानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. अनेकांनी तिच्या विचारांना पाठिंबा दिला, तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली. काहींनी कमेंटमध्ये लिहिले की, “रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या सहन केल्या जातात, मग तीन तासांच्या भक्तीचा आदर करू शकत नाहीस का?” तर आणखी एका युजरने थेट म्हटलं, “हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. तुला त्रास होत असेल तर गणेशोत्सवाच्या दिवसांत मुंबईबाहेर जा.”
काहींनी तिच्यावर प्रादेशिक टीका करत, “ढोल-ताशांना कायदेशीर परवानगी आहे, हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. जर इतकाच त्रास होत असेल तर इथून बिहारला जा” अशी कठोर प्रतिक्रिया दिली.
कशिश कपूरच्या या व्हिडीओमुळे गणेशोत्सवात धार्मिक श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि आधुनिक जीवनातील शांतता या सर्व गोष्टींवर नवा वाद सुरू झाला आहे. काहींनी आवाज नियंत्रणाचे नियम पाळले जावेत असे मत व्यक्त केले तर काहींनी परंपरेत हस्तक्षेप न करण्याचे सांगितले.