Home Breaking News बंडगार्डन रस्त्यावर भीषण आग : टीव्हीएस शोरूम व सर्व्हिस सेंटर जळून खाक,...

बंडगार्डन रस्त्यावर भीषण आग : टीव्हीएस शोरूम व सर्व्हिस सेंटर जळून खाक, तब्बल ६० दुचाकींचा राखाडी ढिगारा

58
0
पुणे – पुणे शहरात सोमवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. बंडगार्डन रस्त्यावरील ताराबाग चौकातील तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी शोरूम व सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने भयानक रूप धारण केले आणि ६० हून अधिक दुचाकी (इलेक्ट्रिक व पेट्रोल) जळून खाक झाल्या.
आगीचा कहर
आगीची तीव्रता एवढी होती की, शोरूममधून प्रचंड धूर बाहेर येऊ लागला. सर्व्हिस सेंटरमधील नवीन तसेच दुरुस्तीकरिता आलेल्या दुचाकींसह इलेक्ट्रिक वायरिंग, बॅटऱ्या, यंत्रसामग्री, संगणक, सोफा, टेबलखुर्च्या, कागदपत्रे आणि एसीदेखील जळून खाक झाले.
आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किट किंवा बॅटरीच्या स्पार्कमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, मात्र तपास सुरू आहे.
 अग्निशमन दलाची धावपळ
सोमवारी रात्री ८.३८ वाजता अग्निशमन नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती मिळताच, नायडू व येरवडा अग्निशमन केंद्रातील गाड्या तसेच मुख्यालयातील एक वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले.
जवानांनी पाहिले असता शोरूममध्ये आगीचे ज्वाळा प्रचंड प्रमाणात पसरल्या होत्या.
श्वसनयंत्रांच्या मदतीने जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले.
या दरम्यान सर्व्हिस सेंटरमध्ये धुरामुळे अडकलेल्या एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर पुन्हा ठिणगी उसळू नये म्हणून कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले.
 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती
घटनास्थळी अग्निशमन अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी कार्यवाही केली. त्याचबरोबर महावितरणचे कर्मचारी व स्थानिक पोलीस तातडीने दाखल होऊन विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला आणि नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले.
 नुकसान आणि धोक्याची घंटा
या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ६० दुचाकींचा संपूर्ण नाश झाला आहे. शोरूममधील इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्यांमुळे धूर व स्फोटाचा धोका वाढला होता, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.