Home Breaking News पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यासह जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड — ५ जणांना अटक, शहरात...

पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यासह जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड — ५ जणांना अटक, शहरात खळबळ

126
0
पुणे, १२ ऑगस्ट — पुणे शहर पोलीस दल सध्या सततच्या कारवायांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रेव्ह पार्टीवरील मोठ्या कारवाईने राज्यभरात खळबळ उडवलेल्या पुणे पोलिसांनी, आता आणखी एका गुन्हेगारी कारवायेला धडक दिली आहे. सोमवारी (ता.११) सहकारनगर परिसरातील एका कुख्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकत ४ ते ५ जणांना रंगेहाथ पकडलं.
या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पकडलेल्या व्यक्तींमध्ये भाजपचा पदाधिकारी औदुंबर विठ्ठल कांबळे हाही असल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय व्यक्तीचा अशा बेकायदेशीर कृतीत सहभाग उघड झाल्याने शहरातील राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये तीव्र चर्चा रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ कारवाई केली. छाप्यामध्ये जुगाराच्या पत्त्यांचे संच, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. औदुंबर कांबळेसह २ ते ३ जणांना अटक करून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांच्या मते, हा अड्डा गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होता आणि स्थानिक पातळीवर काही प्रभावशाली लोकांच्या आडोशाला सुरु असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे पुण्यातील जुगार अड्ड्यांवरील पोलिसांच्या कारवायांना आणखी गती मिळणार असल्याचे दिसते.