माळेगाव, अकोला — प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर अखेर प्रशासनाने पानंद शेत रस्त्याच्या अपूर्ण कामाची दखल घेतली. शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांत तीव्र असंतोष निर्माण झाला होता.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. इंगळे आणि सहाय्यक अभियंता श्री. फुणसे यांनी आपल्या पथकासह माळेगाव बाजार परिसरात पाहणी केली. यावेळी झालेल्या मोजणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या असून शेतकऱ्यांच्या मनात अजूनही समाधान नाही.
ज्ञानेश्वर आखरे यांनी प्रशासनासमोर मागणी ठेवली की, रस्त्याच्या सदोष कामाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा. तसेच नवीन रस्त्याचा प्रस्ताव त्वरीत पाठवावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी गावातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी एकमुखी पाठिंबा देत आखरे यांच्या आंदोलनाची पाठराखण केली. पानंद रस्ता शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचे निकृष्ट व अपूर्ण काम शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर घालत आहे.
प्रशासनाकडून आता यावर तातडीने कारवाई होत नसेल, तर प्रहार जनशक्ती पक्ष अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.