Home Breaking News तेल्हारा तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने कहर – शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान, पंचनामे करून...

तेल्हारा तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने कहर – शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान, पंचनामे करून तात्काळ मदतीची मागणी

46
0
तेल्हारा (जि. अकोला) : दिनांक १६ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तेल्हारा तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून काही गावांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.
आधीच कर्जबाजारीपणामुळे शेतकरी संकटात सापडला असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर आणखी संकट कोसळले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सरसकट ५० टक्के नुकसान झाल्याचे गृहित धरून मदत द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. कारण एक पटवारी दहा गावांचा पंचनामा करण्यासाठी २५ दिवस घेईल आणि तेव्हा झालेले नुकसान दिसणार नाही. त्यामुळे तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री. कुलदीप पाटील, महासचिव श्री. राजेश पाटील खारोडे, प्रहार युवक अध्यक्ष श्री. सुशिल पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवक उपजिल्हाप्रमुख श्री. सुरज खारोडे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे, युवक तालुका अध्यक्ष प्रमोद तायडे, शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष गोपाल घुंगळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी चेतावणी देण्यात आली की, जर शासनाने तात्काळ दखल घेतली नाही, तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील.
तेल्हारा तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने केलेल्या कहरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – पंचनामे करून तातडीने मदत देण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी