Home Breaking News अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पिंपरीत रंगले प्रबोधनपर समतावादी कविसंमेलन

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पिंपरीत रंगले प्रबोधनपर समतावादी कविसंमेलन

55
0
पिंपरी दि. ८ ऑगस्ट २०२५ – “कविता समाजाला एकसंध बांधून ठेवण्याचं सामर्थ्य बाळगते आणि समाज प्रबोधनासाठी समतावादी कविसंमेलनांची आवश्यकता असते,” असे मत ज्येष्ठ कवी सुनिल भिसे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२५ निमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे भव्य प्रबोधनपर समतावादी कविसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या टाळ्यांनी रंगलेलं हे संमेलन समता, बंधुता, विडंबन, न्याय आणि देशभक्तीच्या कवितांनी बहरून गेलं. समाजातील विषमता दूर करून मानवी ऐक्य बळकट करण्याचा संदेश अनेक कविंनी आपल्या ओजस्वी रचनांमधून दिला.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी सुनिल भिसे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाउसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, बाबासाहेब रसाळ, विशाल कसबे, अण्णासाहेब कसबे, गणेश अवघडे, नाना कसबे, संजय ससाणे, नितिन घोलप, केसरताई लांडगे, आशाताई शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरातील नामांकित तसेच निमंत्रित कवी विनोद अष्ट्रळ, दिनेश भोसले, पितांबर लोहार, प्रदीप गांधलीकर, किशोर केदारी, विशाल कसबे, दत्तू ठोकळे, महेंद्र पाटोळे, फुलवती जगताप, राजु जाधव, पुरुषोत्तम हिंगणकर, शरद शेजवळ, आत्माराम हारे, देवेंद्र गांवडे, विजय कांबळे, अनिल नाटेकर, नागनाथ लोंढे, प्रविण बोरसे, राजु पेठे, आशाताई शहाणे, केसरताई लांडगे यांनी विविध विषयांवरील रचना सादर करून सभागृह दणाणून टाकले.
कविसंमेलनाचे प्रास्ताविक विशाल कसबे यांनी केले, सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले तर आभारप्रदर्शन भाउसाहेब आडागळे यांनी केले. महोत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब रसाळ आणि जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात सुनिल भिसे यांनी “आर्टी” ही प्रखर सामाजिक संदेश देणारी कविता सादर केली – “मातंग समाजासाठी दिलेली आर्टी म्हणजे केवळ गाजर हलव्याची वाटी, आर्टी डोंगरा एवढी कृतीशील गोष्ट छोटी, आश्वासनाची पूर्तता सारी खोटी.” या काव्यपंक्तींनी प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला.
कवी विशाल कसबे यांनी “रंगमंचाच्या पडद्यामागचं वास्तव” या कवितेतून जीवनातील संघर्ष आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रवासाचं वास्तव मांडलं – “रंगबिरंगी झगमटाच्या पाठीमागं वास्तव असतं जगण्याचं, काळोखाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं.”
पितांबर लोहार यांनी “महाराष्ट्र हुंकार” या कवितेतून सह्याद्रीची उदारता, सातपुड्याचा आधार आणि मुंबईचा आत्मसन्मान यांचा गौरव केला – “सह्यागिरी उदार माझा, सातपुडा आधार, महाराष्ट्र हुंकार, माझ्या मुंबईचा भ्रतार.”
ज्येष्ठ कवी किशोर केदारी यांनी “समता” या कवितेतून अण्णाभाऊ साठ्यांच्या कार्याची अप्रतिम प्रशंसा केली – “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, काय वर्णावी तुमची महती, चंद्र-सूर्य, हिरे मोती, सर्वांचेच तेज तुमच्या साहित्यापुढे फिके हो पडती.”
प्रसिद्ध कवी अनिल नाटेकर यांनी “लेखणीका” ही कविता सादर करून लेखणीच्या सामर्थ्याने समाजपरिवर्तनाची हाक दिली.
या संमेलनातून केवळ कविता सादर झाल्या नाहीत, तर समता, बंधुता आणि सामाजिक जागरूकतेचा संदेशही शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवला गेला.