पिंपरी, पुणे | प्रतिनिधी : श्रावणी कामत माल व प्रवासी वाहतूकदारांनी सरकारविरोधात चक्काजाम आंदोलनाचा नारा दिला आहे. “ई-चलन कार्यप्रणाली” ही अन्यायकारक व गळचेपी करणारी आहे, असा आरोप करत मंगळवार, १ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजता पासून राज्यव्यापी बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरु होणार आहे. यामध्ये राज्यभरातील ३० पेक्षा अधिक वाहतूक व्यावसायिक संघटनांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
ही माहिती असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स, पुणे चे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पिंपरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्याध्यक्ष गौरव कदम, अनिल शर्मा, विनोद जगजंपी, प्रमोद भावसार आदी उपस्थित होते.
ई-चलन प्रणाली म्हणजे गळचेपी – गौरव कदम
संस्थेचे कार्याध्यक्ष गौरव कदम यांनी सांगितले की, ई-चलन प्रणाली अंतर्गत वाहतूक पोलिसांकडून जबरदस्तीने दंड वसूल केला जातो. पूर्वीचे चुकीचे दंड अजूनही थकबाकी म्हणून येत आहेत. यामुळे वाहनधारक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. शासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राज्यभरातील संघटनांचा एकमुखी पाठिंबा
आंदोलनात सहभागी असलेल्या प्रमुख संघटना:
महाराष्ट्र ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक महासंघ
महाराष्ट्र हेवी वेहिकल ऑपरेटर असोसिएशन
न्हावा शेवा कंटेनर असोसिएशन
ऑल इंडिया मोटर काँग्रेस
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन
मुंबई बस वाहतूक महासंघ
शिव औदुंबर प्रतिष्ठान
साकीनाका ट्रक टेम्पो असोसिएशन
आणि अनेक स्थानिक संघटना
या सर्व संघटना एकत्र येऊन वाहतूकदार बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सहभागी होत आहेत.
वाहतूक व्यवसायिकांच्या प्रमुख मागण्या
ई-चलन प्रणालीत पारदर्शकता आणावी
चुकीचे दंड माफ करावेत
क्लिनर ठेवण्याची सक्ती बंद करावी
शहरात वाहतुकीवर असणाऱ्या वेळेच्या बंधनांमध्ये शिथिलता आणावी
जीपीएस ट्रॅकिंग आणि सहीसहित चालान प्रणाली लागू करावी
वाहनतळासाठी राखीव जागांचा वापर करता यावा
‘अभय योजना’ आणि ‘लोक अदालत’ प्रभावीपणे राबवाव्यात
वाहतूकदार प्रतिनिधींच्या समित्या प्रत्येक जिल्हा व राज्यस्तरावर स्थापन कराव्यात
आंदोलनामुळे सामान्य जनतेस होणाऱ्या त्रासासाठी प्रशासन जबाबदार – अनिल शर्मा
कार्याध्यक्ष अनिल शर्मा यांनी स्पष्ट केलं की, आंदोलन शांततेत होणार असलं तरी सामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल, याची जबाबदारी राज्य सरकार व प्रशासनाची असेल. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यात लक्ष घालून निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.
ई-चलन यंत्रणेतील त्रुटी – विनोद जगजंपी यांचा आरोप
खजिनदार विनोद जगजंपी यांनी सांगितले की, अनेकदा पोलिस स्वतःच्या मोबाईलवरून फोटो टाकतात, अनधिकृत वॉर्डन्स मशीन वापरतात, केसची लेखी प्रत मिळत नाही, केसवर डिजिटल सही घेतली जात नाही. त्यामुळे चालान यंत्रणेतील विश्वासार्हता पूर्णतः बिघडली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आझाद मैदानात उपोषण सुरु
या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, मुंबईतील आझाद मैदानात १६ जूनपासून आमरण उपोषण सुरू आहे.