पिंपरी-चिंचवड (मोशी) : समाजात महिलांच्या सन्मानासाठी अनेक कायदे असले तरी, प्रत्यक्षात अजूनही काही ठिकाणी सासरच्या मंडळींकडून विवाहितांवर होणाऱ्या अत्याचारांची साखळी थांबताना दिसत नाही. अशाच एका धक्कादायक प्रकारात मोशीतील बोऱ्हाडेवस्ती येथे किरण आशिष धामोदर या विवाहितेने सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना १७ जुलै रोजी घडली.
या प्रकरणात किरण यांच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पती आशिष धामोदर, सासू सुनंदा धामोदर व सासरे दीपक धामोदर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पती आशिष याला अटक केली आहे.
फिर्यादीच्या माहितीनुसार, किरण हिला सासरी हुंड्याच्या नावाखाली वेळोवेळी पैसे, मोटारसायकल यासाठी त्रास दिला जात होता. तिच्यावर मारहाण, शिवीगाळ, धमकी यांचा सातत्याने भडिमार होत होता. एकूण ५ लाख रुपये देऊनही तिचा छळ थांबला नाही आणि या मानसिक यातनांना कंटाळून तिने आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतला.
संपूर्ण घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून महिलांवरील छळाच्या घटनांना आळा बसवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.