मुंबई – चेंबूरमधील रहिवासी धर्मेंद्र इंदूर राय (वय ५४) याच्यावर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आपल्या सख्ख्या बहिणीला मानसिकदृष्ट्या विकृतीग्रस्त असल्याचा बनाव करून चार अनोळखी महिला बाउन्सर्सच्या मदतीने तिला जबरदस्तीने मनोरुग्णालयात भरती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसंच, वृद्ध आईलाही तिच्या इच्छेविरुद्ध वृद्धाश्रमात पाठवण्यात आले.
ही घटना ७ जुलै ते १८ जुलै २०२५ या कालावधीत सिंध हौसिंग सोसायटी, पुणे येथे घडली. ५६ वर्षांच्या महिलेनं याबाबत चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी धर्मेंद्र रायला अटक केली आहे.
वारसाहक्कासाठी विकृत कृत्य
फिर्यादी आणि त्यांची वृद्ध आई आपल्या वडिलोपार्जित घरात राहत होत्या. मात्र, त्या मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्यासाठी धर्मेंद्र रायने तिच्यावर मानसिक उपचारांची गरज असल्याचा बनाव केला. डाव्या हातामध्ये इंजेक्शन दिले आणि तिला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन मनोरुग्णालयात भरती केले.
वृद्ध आईलाही जबरदस्ती
या सर्व प्रकारादरम्यान, त्या महिलांच्या वयोवृद्ध आईला देखील कोणतीही पूर्वसूचना न देता वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे महिला मानसिकरित्या त्रस्त झाल्या होत्या.
शेजारी व मित्रांच्या तत्परतेमुळे सुटका
महिलेच्या शेजाऱ्यांना व मित्र-मैत्रिणींना या घटनेबाबत समजताच त्यांनी वेळेत हस्तक्षेप करत तिची मनोरुग्णालयातून सुटका केली. घरी परत आल्यावरही धर्मेंद्र रायने तिला घरात येऊ दिले नाही. अखेर पोलिसांना कळवले असता वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज हांडे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.
गुन्ह्यांत विविध कलमांचा समावेश
धर्मेंद्र रायसह त्याच्यासोबत असलेल्या चार अनोळखी महिला बाउन्सर्सवर मेंटल हेल्थ केअर अॅक्ट तसेच विविध भारतीय दंडविधानातील कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.