Home Breaking News मावळात रस्त्यांची दयनीय अवस्था! टाकवे – राजपुरी – बेलज मार्ग खड्ड्यांनी भरलेला,...

मावळात रस्त्यांची दयनीय अवस्था! टाकवे – राजपुरी – बेलज मार्ग खड्ड्यांनी भरलेला, शासनाचे दुर्लक्ष ठळक!

14
0
विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यवसायिक त्रस्त; मुसळधार पावसात जीव धोक्यात घालून प्रवास; तात्काळ दुरुस्तीची मागणी
मावळ तालुका (पुणे) – पावसाळा सुरू होऊन अवघे काही आठवडेच झाले असताना, आंदर मावळातील टाकवे – राजपुरी – बेलज मार्गाची दयनीय स्थिती समोर आली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे नागरिकांचे प्रवासात अक्षरशः हाल होत आहेत. मुसळधार पावसात रस्त्यावर खड्ड्यांत पाणी साचत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
रोज प्रवास करणाऱ्या वर्गाचे हाल
या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यवसायिक आणि ग्रामीण नागरिक प्रवास करतात. विशेषतः नवलाख उंबरे औद्योगिक वसाहतीत काम करणारे आंदर मावळातील शेकडो कामगार याच रस्त्याचा वापर करत असतात. मात्र रस्त्याच्या विदारक स्थितीमुळे त्यांना अपार त्रास सहन करावा लागत आहे.
 अवजड वाहनांमुळे परिस्थिती आणखी बिकट
राजपुरी व बेलज परिसरात क्रशर खाण व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने, या मार्गावरून अवजड ट्रक आणि दगड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आधीच खचलेल्या रस्त्यावर ताण वाढत असून, खड्ड्यांची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
 ग्रामस्थांचा संताप – “शासनाने पूर्ण दुर्लक्ष केलं!”
२०१७ नंतर या रस्त्यावर शासनाकडून कोणताही निधी वितरित झालेला नाही, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थ देत आहेत. स्थानिक नागरिक बाजीराव ओव्हाळ (बेलज) यांनी म्हटले,
“टाकवे – राजपुरी रस्त्याकडे शासनाने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. इतर भागांत निधी वाटला जातो, मग आमच्या भागाला का नाही? हा आमचा प्रमुख रस्ता आहे आणि त्याची तात्काळ डागडुजी व्हावी.”
 खड्ड्यांमधून प्रवास म्हणजे जीवघेणं आव्हान
पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांवर खड्डे दिसत नाहीत आणि त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. सार्वजनिक वाहतुकीचाही या भागात मोठा ताण आहे. ग्रामीण रुग्णालये, शाळा आणि बाजारपेठांपर्यंत पोहोचणे कठीण बनले आहे.