पुणे | कात्रज : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. केवळ भिक मागण्यासाठी दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले असून, या प्रकरणाने संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे.
ही घटना २५ जुलैच्या मध्यरात्री कात्रज येथील वंडर सिटी झोपडपट्टी परिसरात घडली. चिमुकली आपल्या आईसोबत झोपलेली असताना, संधी साधून अपहरणकर्त्यांनी तिला झोळीतून पळवले. मुलगी बेपत्ता असल्याचे लक्षात येताच पालकांनी तत्काळ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीनंतर पोलीस यंत्रणा लगेचच सक्रिय झाली आणि जवळपास १४० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सततच्या तपासानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा माग काढत धाराशिव येथून चिमुकलीची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात सुनील भोसले, शंकर पवार, गणेश पवार, शालुबाई काळे आणि मंगल काळे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस तपासात समोर आले आहे की, भिक मागण्यासाठी ही चिमुकली पळवण्यात आली होती. अपहरणकर्त्यांचा हेतू अत्यंत क्रूर आणि अमानवी होता. एका निष्पाप मुलीचा वापर भिक मागण्यासाठी करण्याचा प्रकार समाजातील गंभीर विकृतीचे दर्शन घडवतो.
या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कार्यवाही करत मुलीला तिच्या पालकांकडे सुखरूप सोपवले आहे. या यशस्वी कारवाईसाठी पुणे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर हे या यशामागचे मुख्य कारण ठरले.
ही घटना पालकांना आणि समाजाला जागृत करणारी आहे. आपल्या मुलांवर सतत लक्ष ठेवणे, परिसरातील संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष न करणे, आणि पोलिसांशी तत्काळ संपर्क साधणे आवश्यक आहे.