पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या गुरुवारी, 17 जुलै 2025 रोजी, शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पर्वती, चांदणी चौक आणि वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिन्यांच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणी विभागाकडून देण्यात आली आहे.
या कामांमुळे 18 जुलै रोजी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार आहे, त्यामुळे पुणेकरांनी अगोदरच पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन PMC ने केले आहे.
कोणत्या ठिकाणी कामं होणार?
पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य प्रीस्ट्रेस लाइनवर गळती दुरुस्ती
जुन्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात फ्लोमीटर बसवणे
पर्वती एमएलआर, एचएलआर, एलएलआर टाकी परिसर, टँकर पॉइंट आणि एसएनडीटी पंपिंग स्टेशन येथे देखभाल आणि सुधारणा कामं
🔹 पर्वती एचएलआर टाकी परिसरात सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर फेज 1 आणि 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर व लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेनगर, सॅलिसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पार्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, कोंढवा खुर्द (सर्व्हे नंबर 42), साईबाबा नगर.
🔹 पर्वती एलएलआर टाकी परिसरात शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट.
🔹 वारजे जलकेंद्राअंतर्गत चांदणी चौक, गांधी भवन टँक, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर.
PMC कडून पुणेकरांना आवाहन
पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, “शहरातील पाण्याचा दर्जा आणि दाब योग्य राहावा यासाठी ही कामं आवश्यक आहेत. नागरिकांनी योग्य नियोजन करून पुरेसा पाणीसाठा करावा आणि मनपाला सहकार्य करावे.”
पावसाळ्यात आणखी अडचणी होऊ नयेत म्हणून…
पावसामुळे रस्त्यांवर आधीच वाहतुकीची अडचण असते. त्यातच पाणी नसल्याने स्वयंपाक, साफसफाई आणि इतर घरगुती कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी ही माहिती लक्षात घेऊन जाणूनबुजून पाण्याचा अपव्यय टाळावा.