‘ExploreiT’: पुण्याच्या एका तरुणाचा पर्यावरण प्रेमातून स्टार्टअपपर्यंतचा प्रवास; वॉटरलेस टॉयलेट, अपशिष्ट व्यवस्थापन आणि सस्टेनेबिलिटीसाठी देशभरात बदल घडवणारा प्रकल्प
पुणे – हवामान बदलाबद्दल केवळ चर्चा न करता थेट कृतीवर भर देणारा ‘ExploreiT’ हा पुण्यातील स्टार्टअप सध्या देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सस्टेनेबिलिटीचे नवे मॉडेल बनतोय. संस्थेचे संस्थापक शिवम सिंग यांनी व्यवस्थापन शिक्षण घेतल्यानंतर आपले जीवन पूर्णपणे पर्यावरणरक्षणासाठी झोकून दिले.
लडाखमध्ये पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी वॉटरलेस टॉयलेट
ExploreiT ने लडाखमध्ये पाणीटंचाई आणि टूरिझममुळे निर्माण झालेल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत वॉटरलेस टॉयलेट्स आणि अपशिष्ट व्यवस्थापनाच्या नाविन्यपूर्ण प्रणाली सुरू केल्या. “लडाखमध्ये पारंपरिक शौचालयांपासून आधुनिक, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या यंत्रणांवर झालेला बदल हानिकारक ठरत होता. यावर शाश्वत उपाय हवा होता,” असे शिवम सांगतात.
सस्टेनेबिलिटी सेवांची ‘Amazon’सदृश यंत्रणा
ExploreiT आता सस्टेनेबिलिटी सल्लागार सेवांमध्ये एक अग्रगण्य कंपनी बनली आहे. या अंतर्गत, विविध कंपन्यांना त्यांच्या पर्यावरणीय मानकांचा आढावा घेऊन CSR फंडातून ‘ग्रीन प्रोजेक्ट्स’ राबवण्याची दिशा कंपनी देते. शाळांमध्ये पर्यावरणस्नेही इमारती, सौर उर्जेची व्यवस्था, अपशिष्ट पुनर्वापर केंद्र, बटरफ्लाय गार्डन, आणि EV चार्जिंग स्टेशन हे ExploreiT चे खास प्रकल्प आहेत.
शाश्वत वृक्षारोपण आणि खऱ्या निसर्गाची पुनर्रचना
ExploreiT ने कॅम्प आणि येरवडा खुल्या कारागृहात केलेल्या वृक्षारोपण प्रकल्पात ७२१ झाडं ९ ते १० महिन्यांनंतरही जगली आहेत. हे प्रकल्प पश्चिम घाटातील स्थानिक प्रजाती पुनर्रुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत. “जुन्या घिसेपिटलेल्या वृक्षारोपण मोहिमांपेक्षा, आम्ही प्राणवायू निर्माण करणारे, स्थानिक हवामानाशी सुसंगत झाडं लावत आहोत,” असे सिंग म्हणतात.
‘सोल्युशनिस्ट’ मनोवृत्ती आणि नवतंत्रज्ञानाची सांगड
ExploreiT चा दृष्टिकोन केवळ पर्यावरणवादावर आधारित नसून, AI व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात जास्त प्रभाव निर्माण करणे, हे या स्टार्टअपचे वैशिष्ट्य आहे. “आमच्या अंदाजानुसार, एकतृतीयांश किंवा अर्ध्या बजेटमध्ये तिप्पट परिणाम साधता येतो,” असे शिवम सांगतात.
तरुण पिढीचा कल आणि पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा
“तरुणांचा पर्यावरणाकडे कल वाढतोय, पण पालकांनीही अशा नव्या क्षेत्रात पुढे जाण्याचा धाडसी निर्णय स्वीकारायला हवा,” असे शिवम सांगतात. ते स्वतः संयुक्त कुटुंबातून येत असून कोणताही दबाव न आल्यामुळे पर्यावरण सेवेसाठी काम करण्याचा मार्ग निवडू शकले.
भारत ते मिडल ईस्ट, युरोप आणि साउथ एशिया – ग्लोबल व्हिजन
ExploreiT फक्त भारतापुरताच सीमित राहिलेला नाही. लडाखसारख्या दुर्गम भागांपासून ते आंतरराष्ट्रीय प्रकल्पांपर्यंत, हा स्टार्टअप सस्टेनेबिलिटीच्या क्रांतीचे नेतृत्व करत आहे.