मुंबई, २३ जून २०२५ – लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांचे आज सकाळी विधान भवन, मुंबई येथे आगमन झाले. त्यांच्या आगमनानिमित्ताने आयोजित ‘संसद तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदे’च्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. लोकसभा अध्यक्ष यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात आला. या थाटामाठात भरलेल्या सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि इतर विविध राज्यांचे विधिमंडळ सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील संसद व राज्य विधिमंडळांमधील अंदाज समित्यांचे सदस्य, तसेच राज्यकर्ते व धोरण निर्माते सहभागी होत असून, शासनाच्या खर्चाच्या नियंत्रणात पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेसंदर्भातील मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या स्वागत भाषणात म्हटले की, “ही परिषद केवळ आर्थिक अंदाज नव्हे तर लोकशाही प्रक्रियेत पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख कारभार घडवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
या परिषदेमुळे राज्य व केंद्र सरकारच्या अंदाज समित्यांमधील समन्वय वाढून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेची गुणवत्ता अधिक प्रभावी होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
ठिकाण: विधान भवन, मुंबई वेळ: सकाळी १०.१५ वा. दिनांक: २३ जून २०२५