Home Breaking News एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजचा ‘नवरस’ उत्सव उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रसिक...

एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजचा ‘नवरस’ उत्सव उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रसिक मंत्रमुग्ध

45
0
पिंपरी – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘नवरस’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीतील नऊ रसांचा कलात्मक, भावनात्मक आणि सर्जनशील आविष्कार साकारत उपस्थित रसिकांची मनं जिंकली.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, निवृत्त सैनिक अधिकारी डॉ. राजेंद्र मोरे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रतिनिधी डॉ. योगेश भावसार, सिनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. स्मृती पाठक, ज्यू. कॉलेजचे प्राचार्य संदीप पाटील, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनाने झाली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत, प्रास्ताविक, मार्गदर्शनपर भाषणे आणि बक्षीस वितरण पार पडले. ‘नवरस’ थीमअंतर्गत नृत्य, नाट्य, संगीत, स्कीट यांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी वीर, करुण, हास्य, रौद्र, अद्भुत, भयानक आणि शांती अशा मानवी भावभावनांचा प्रभावी आविष्कार केला. रंग, राग आणि भावनांचा सुरेख संगम साधत विद्यार्थ्यांनी संपूर्ण सभागृहाला मंत्रमुग्ध केले.
वर्षभरात विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच पोस्टर मेकिंग आणि दांडिया स्पर्धेत विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी, “कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा सुंदर संगम म्हणजे एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजचा ‘नवरस उत्सव’ असून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून सर्वांगीण शिक्षणाचा आदर्श दिसतो,” असे गौरवोद्गार काढले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.