लोनावळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते दिलीप हरिभाऊ पवार (B.A.) यांनी पक्षासाठी केलेल्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेऊन त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी आमदार मा. सुनीलअण्णा शेळके यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मागणी लोनावळ्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
दिलीप पवार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – ज्येष्ठ नागरिक सेल, लोनावळा तसेच ऑल इंडिया रेल्वे रिटायर्ड फेडरेशन, लोनावळा यांचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करत असून, सरकारी सेवेत असतानाही त्यांनी कधीही पक्षाकडे पद किंवा तिकीट मागितले नाही. पक्षाचे आदेश आणि ध्येय समोर ठेवून त्यांनी सभा, बैठका, निवडणुका व आंदोलनांमध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे.
पक्षाच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय सहभाग घेत, विविध सामाजिक शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. निवृत्तीनंतर मागील चार वर्षांपासून ते अधिक जोमाने पक्षकार्यात सक्रिय असून, आमदार सुनील शेळके यांच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी संघटनात्मक पातळीवर भरीव काम केले आहे.
यंदाच्या लोनावळा नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नसली, तरीही त्यांनी कोणतीही नाराजी न दाखवता ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन पक्षासाठी प्रचार व संघटनात्मक काम सुरूच ठेवले. त्यांच्या या निष्ठावान भूमिकेचे कौतुक करत, पक्षाने त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा योग्य सन्मान करावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
दिलीप पवार यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्यास, लोनावळा शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, सामाजिक विषय आणि विकासकामांना अधिक बळ मिळेल, असा विश्वासही या मागणीमागे व्यक्त करण्यात आला आहे.