Home Breaking News काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! संजू सॅमसनचा फटका थेट पंचांच्या पायावर, मैदानातच कोसळले...

काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! संजू सॅमसनचा फटका थेट पंचांच्या पायावर, मैदानातच कोसळले रोहन पंडीत

70
0

अहमदाबाद – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या टी-२० सामन्यात क्रिकेटप्रेमींचा काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला. भारतीय फलंदाज संजू सॅमसनच्या जोरदार फटक्यामुळे पंच रोहन पंडीत जखमी झाले असून, ते मैदानातच कळवळत कोसळल्याचे दृश्य पाहून स्टेडियममध्ये क्षणभर शांतता पसरली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही धक्कादायक घटना सामन्याच्या नवव्या षटकात घडली. दक्षिण आफ्रिकेकडून डोनोवेन फेरेरिया गोलंदाजी करत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर संजू सॅमसन स्ट्राइकवर होता. संजू यावेळी जबरदस्त लयीत फलंदाजी करत असून, गोलंदाजांवर आक्रमक फटकेबाजी करत होता.

समोर आलेल्या चेंडूवर संजूने सरळ बॅटने जोरदार फटका मारला. चेंडू इतक्या वेगाने गेला की, तो थेट गोलंदाजाच्या दिशेने झेपावला. गोलंदाजाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग प्रचंड असल्याने तो चेंडू थांबवू शकला नाही. गोलंदाजाच्या हाताला स्पर्श करत तो चेंडू थेट पंच रोहन पंडीत यांच्या पायावर जोरात आदळला.

चेंडूचा फटका इतका जबरदस्त होता की, पंच रोहन पंडीत वेदनेने कळवळले आणि मैदानातच खाली कोसळले. हे दृश्य पाहताच खेळाडू, पंच आणि प्रेक्षक सगळेच हादरले. क्षणभर सामना थांबवण्यात आला.

संजूची माणुसकी, डॉक्टरांची तत्काळ धाव

पंच खाली पडताच संजू सॅमसन धावत त्यांच्या जवळ गेला आणि त्यांची विचारपूस केली. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय पथकाने मैदानात धाव घेतली आणि पंचांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. सुदैवाने मोठी दुखापत टळली असून, काही वेळानंतर पंचांची प्रकृती स्थिर असल्याचे कळाले.

या घटनेनंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात भीतीची छाया पसरली होती. पंच सुरक्षित असल्याचे समजताच प्रेक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

संजूची झुंजार खेळी, पण दुर्दैवी बाद

या सामन्यात संजू सॅमसन उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र या घटनेनंतर लगेचच पुढील षटकात पहिल्याच चेंडूवर संजू बाद झाला. संजूने २२ चेंडूत ३७ धावांची झुंजार खेळी केली असून, त्यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

हा प्रसंग क्रिकेटमधील धोका आणि खेळाडूंसह पंचांनाही किती मोठा धोका असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला आहे.