मथुरा | दिल्लीपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या यमुना एक्सप्रेसवेवर मंगळवारी पहाटे काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. घनदाट धुके, कडाक्याची थंडी आणि त्यातच अचानक उसळलेल्या आगीमुळे चार निष्पाप जीव आगीत होरपळून मृत्युमुखी पडले. एक्सप्रेसवेवर काही क्षणांसाठी जणू मृत्यूनेच तांडव मांडल्याचे भीषण चित्र पाहायला मिळाले.
पहाटेच्या अंधुक प्रकाशात धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होती. त्याचवेळी एका वाहनाला आग लागली आणि काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या लपटांमध्ये अडकलेल्या लोकांच्या रडण्याच्या, किंचाळण्याच्या आणि मदतीसाठीच्या हाका दूरवर ऐकू येत होत्या, मात्र घनदाट धुके आणि आग यामुळे मदत पोहोचण्यास विलंब झाला.
अपघातानंतरचा परिसर हृदय पिळवटून टाकणारा होता. एक्सप्रेसवेवर विखुरलेले सामान, अन्नपदार्थ, जळालेल्या वस्तू आणि रक्ताने माखलेला रस्ता पाहून उपस्थितांचे काळीज सुन्न झाले. आप्तस्वकीयांना डोळ्यांसमोर तडफडत असताना पाहून हतबल झालेले नातेवाईक रस्त्याच्या कडेला बसून अश्रू ढाळत होते. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठ्या प्रयत्नांची गरज भासली. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासात धुके, वेग आणि अपघातानंतर लागलेली आग हे या दुर्घटनेचे मुख्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा हिवाळ्यातील धुक्यामुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि धुक्यात अतिरिक्त काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा असे मृत्यूचे प्रवास थांबणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जात आहे.