Home Breaking News पुण्यात एटीएसची मोठी कारवाई : आयएसआयएस निधी व शस्त्र पुरवठा प्रकरणात १९...

पुण्यात एटीएसची मोठी कारवाई : आयएसआयएस निधी व शस्त्र पुरवठा प्रकरणात १९ ठिकाणी छापे

93
0
पुणे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) गुरुवारी पुणे शहरातील कोंढवा, खडक, वानवडी, खडकी आणि भोसरी परिसरात एकाच वेळी मोठी कारवाई करत १९ संशयितांच्या घरांवर व कार्यालयांवर छापे टाकले. ही कारवाई २०२३ मध्ये उघडकीस आलेल्या आयएसआयएस (ISIS) दहशतवादी निधी आणि शस्त्र पुरवठा प्रकरणाशी संबंधित असल्याचे समजते.
एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पुढील तपासादरम्यान मिळालेल्या ठोस सुगाव्यावरून ही धडक मोहीम हाती घेण्यात आली. पहाटेपासूनच विविध भागांमध्ये छापेमारी सुरू करण्यात आली होती. अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, अद्याप कोणतीही अधिकृत अटक झाल्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. एटीएसने सांगितले की, “शोधमोहीम आणि तपासकार्य सुरू आहे.”
२०२३ मधील घटनेपासून उलगडत गेलेले धागेदोरे
१८ जुलै २०२३ रोजी कोथरुड येथे वाहन चोरीच्या संशयावरून तीन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. आरोपींची ओळख मोहम्मद शहनवाज आलम (३१, झारखंड), मोहम्मद युसुफ खान (२५, रतलाम, मध्यप्रदेश) आणि मोहम्मद युनूस साकी (२७, रतलाम) अशी करण्यात आली होती. हे सर्वजण पुण्यातील कोंढव्यात राहत असल्याचे समोर आले.
घर झडती दरम्यान पोलिसांना “ड्रोन साहित्य”, पांढरे पावडर, पिस्तूल पाउच आणि जिवंत काडतूस आढळून आले होते. त्यानंतर या घटनेचा धागा थेट आयएसआयएसशी जोडला गेला. पुढील तपासात समोर आले की, युसुफ खान आणि युनूस साकी हे अल-सुफा नावाच्या आयएसआयएस-संबंधित दहशतवादी टोळीचे सदस्य आहेत.
बॉम्बनिर्मितीचे साहित्य व निधी पुरवठा
एटीएसने तपासादरम्यान केमिकल पावडर, कोळसा, थर्मामीटर, ड्रॉपर, सोल्डरिंग गन, बॅटऱ्या, अलार्म घड्याळ यांसारखे बॉम्बनिर्मिती साहित्य जप्त केले. तसेच तपासात उघड झाले की, आरोपी पुण्यात “ग्राफिक डिझायनर” म्हणून काम करत दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणी करत होते.
या प्रकरणात अटीएसने आयटी इंजिनिअर अब्दुल कादिर पठाण, एस. एन. kazi, झुल्फिकार अली बारोदवाला यांना अटक करून त्यांच्याकडून आश्रय व आर्थिक मदत मिळाल्याचा आरोप केला आहे.
कायदेशीर कारवाई आणि पुढील तपास
या सर्वांविरुद्ध कठोर ‘गैरकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा’ (UAPA) लागू करण्यात आला असून तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा पुणे शहरात सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे.