राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती गंभीर झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. “पूरग्रस्तांच्या मुलींच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना उचलणार आहे,” असे आश्वासन देत त्यांनी संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा दिला आहे.
शिंदे म्हणाले की, “पूरामुळे अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. घरं, शेती, जनावरे यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या कठीण काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवली जाईल.”
याशिवाय त्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत की, सर्व जिल्ह्यांमध्ये मदतकार्य तत्परतेने सुरू ठेवावं आणि कोणत्याही पूरग्रस्त कुटुंबाला मदतीपासून वंचित ठेवू नये. पूरग्रस्त भागातील तरुण मुलींना विवाहासाठी आर्थिक आधार देण्याचा निर्णय हा शिंदे सरकारच्या सामाजिक बांधिलकीचा मोठा संदेश असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
या घोषणेमुळे पूरग्रस्त नागरिकांमध्ये दिलासा पसरला आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी शासन अशा प्रकारे पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त कुटुंबांच्या अश्रूंना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही पुन्हा उंचावेल.