Home Breaking News ग्रामीण विकासासाठी मोठे पाऊल! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘नाम फाऊंडेशन’सोबत सामंजस्य करार

ग्रामीण विकासासाठी मोठे पाऊल! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘नाम फाऊंडेशन’सोबत सामंजस्य करार

38
0
पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यांचा सुलभ दळणवळण मार्ग आणि नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात महाराष्ट्र शासन आणि ‘नाम फाऊंडेशन’ यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
या कराराअंतर्गत ग्रामपातळीवरील रस्ते सुविधा व्यापक स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. यात ग्रामप्रणालीतील रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे मार्ग, शीव रस्ते आणि पाणंद रस्ते बांधण्याची मोठी योजना आखण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाणारे युवक, तसेच रुग्णालयाकडे धाव घेणारे ग्रामस्थ या सर्वांसाठी ही सुविधा जीवनदायी ठरणार आहे. रस्त्यांच्या अभावामुळे अनेक वेळा शेतमाल बाजारात पोहोचवताना होणारे नुकसान, रुग्णवाहिका वेळेत न पोहोचण्याची समस्या किंवा मुलांना शाळेत जाण्यात होणाऱ्या अडचणी या सर्व समस्यांवर आता उपाय होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “ग्रामीण भागाचा विकास म्हणजेच राज्याचा सर्वांगीण विकास. रस्ते हे विकासाचे प्राण आहेत. ‘नाम फाऊंडेशन’सोबतच्या या करारामुळे गावोगाव रस्त्यांचे जाळे निर्माण होईल आणि शेतकरी व ग्रामीण जनता आत्मनिर्भरतेच्या दिशेने सक्षम होईल.”